स्पर्धा परीक्षार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागविणार; १५ सप्टेंबरपर्यंत लेखी अभिप्राय देण्याची संधी
नागपूर, दि. १५ : शासकीय भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासोबतच परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या सुधारणांच्या प्रक्रियेला आता नागपूर विभागात वेग येणार आहे. परीक्षा पद्धतीतील बदलांसाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबर २०२६ रोजी नागपुरात संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहे. स्पर्धा परीक्षार्थींसह पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, अभ्यासिका चालक, कोचिंग वर्गांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.
समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस ठाण्यामागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे उपस्थित राहतील. या संवादातून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, सुरक्षा व्यवस्था आणि उमेदवारांच्या अडचणी याबाबत प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्तांकडून आढावा
या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
नागपूर महसूल विभागातील विविध घटकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले अनुभव आणि सूचना समितीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. भरती परीक्षांच्या भवितव्याशी संबंधित सुधारणा करताना प्रत्यक्ष परीक्षार्थी आणि इतर संबंधित घटकांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत अभिप्राय देता येणार
नागपूर विभागातील नागरिक आणि संबंधित घटकांकडून सूचना गोळा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कक्षामार्फत अभिप्राय स्वीकारले जातील.
निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे लेखी सूचना सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय शाखेत स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या नागरिकांना nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावरही आपला लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे.
प्रश्नपत्रिकेपासून निकालापर्यंत सुरक्षेवर भर
उच्चस्तरीय समितीसमोर केवळ परीक्षा केंद्रांपुरत्या सूचना अपेक्षित नसून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा उद्देश आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, तिची तपासणी व अंतिम स्वरूप देणे, छपाई किंवा डिजिटल वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, उमेदवारांच्या प्रतिसादाची नोंद आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन या प्रत्येक टप्प्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीय माहिती बाहेर जाणे, बनावट उमेदवारांमार्फत परीक्षा देणे, उमेदवार किंवा संबंधित व्यक्तींमधील संगनमत तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांचा गैरवापर रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही अभिप्राय घेतला जाणार आहे.
तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही सूचना
परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी जैवमितीय प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, डिजिटल नोंदवही आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यावरही समिती सूचना स्वीकारणार आहे.
याशिवाय, देशातील किंवा परदेशातील यशस्वी परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून राज्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या उपाययोजना सुचविण्याची संधीही संबंधितांना देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा मानके निश्चित करणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आणि उमेदवारांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे, या मुद्द्यांवरही सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्राप्त सूचनांचा समितीकडून अभ्यास
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या उद्देशाने शासनाने ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रत्येक महसूल विभागातील विद्यार्थ्यांपासून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांपर्यंत विविध घटकांचा सहभाग घेऊन परीक्षा व्यवस्थेतील आवश्यक बदलांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांचे संकलन करून ते समितीकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर या सूचनांचा सविस्तर अभ्यास करून समिती राज्य शासनाला अंतिम अहवाल सादर करणार आहे.
स्पर्धा परीक्षांवरील उमेदवारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुरक्षा यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूरमधील १६ सप्टेंबरच्या संवाद कार्यक्रमाकडे परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यासाठी मिळणारी महत्त्वाची संधी म्हणून पाहिले जात आहे.
