शिवसेना–राष्ट्रवादी पक्षनाव व चिन्ह वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; असीम सरोदे यांचे महत्त्वाचे भाष्य
मुंबई/नवी दिल्ली, दि. २०: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या पक्षनाव व चिन्ह वादावर उद्या (२१ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग यांनी शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट न्यायालयीन प्रक्रियेत गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आता त्यावर सुनावणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेले विधान चर्चेत आले आहे. सुनावणीआधी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये संभाव्य राजकीय परिणामांवर भाष्य केले आहे.
असीम सरोदे काय म्हणाले?
“शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह..सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी Reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल…”
दरम्यान, उद्याच्या सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेतं, अंतरिम आदेश येतो का, तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगितीचा मुद्दा उपस्थित होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
