मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला
मुंबई, दि. २०: मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे. मात्र, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, अकोला, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पाऊस ओसरल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे गाड्या काही प्रमाणात उशिराने धावत आहेत. सखल भागात अद्यापही पाणी साठलं असलं तरीही बेस्ट बस सेवा सुरळीत सुरु आहे. मोनोरेल सेवा काल संध्याकाळी काही ठिकाणी बंद पडली होती परंतु ती आज सकाळपासून सुरु झाली आहे. उपमुख्यमंती अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हवामान विभागाने मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे , पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. राज्यातल्या अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पूरपरिस्थितीमुळे राज्यात गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं आहे. आज सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून कळविण्यात आले होते.
