मच्छीमार, किनारपट्टीवरील नागरिक आणि पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन
वसई-विरार किनाऱ्यालगत कमी तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. २० : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा चोवीस तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छीमार, किनारपट्टीवरील नागरिक तसेच पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला असला, तरी त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील उच्च भरतीमुळे समुद्रातील परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका, ट्रॉलर तसेच मासेमारीसाठी वापरले जाणारे साहित्य सुरक्षितपणे बांधून ठेवावे. समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रकिनारा आणि खडकाळ भागात जाणे टाळावे. विशेषतः लहान मुलांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि अधिकृत हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी अरबी समुद्रात वसई-विरार किनारपट्टीपासून सुमारे सत्तावन्न किलोमीटर अंतरावर आणि पाच किलोमीटर खोलीवर कमी तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. हा भूकंप सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ३.२ तीव्रतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे.
या भूकंपाचे धक्के जमिनीवर कोणत्याही ठिकाणी जाणवले नसून, राज्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (इनकॉईस) यांनी या भूकंपानंतर त्सुनामीबाबत कोणताही इशारा अथवा अलर्ट जारी केलेला नाही. त्यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसून नागरिकांनी घाबरून न जाता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.
समुद्रातील किंवा किनारपट्टीवरील कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाचा हेल्पलाईन क्रमांक १५५४, किनारी सुरक्षा हेल्पलाईन १०९३ तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक १०७० उपलब्ध असून आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे.
उच्च भरतीचा ऑरेंज अलर्ट कायम असताना समुद्रकिनाऱ्यालगत अनावश्यक गर्दी टाळणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि कोणतीही अप्रमाणित माहिती प्रसारित न करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
