१७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी तयारीला वेग; सामाजिक उपक्रमांतील योगदानाबद्दल आयोजकांचे राज्यपालांकडून कौतुक
मुंबई, दि. १ : देशातील सर्वात प्रतिष्ठित धावण्याच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७ च्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. आगामी १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला. यानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहिले.
यावेळी राज्यपालांनी मुंबई मॅरेथॉनने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा गौरव करत आयोजकांचे अभिनंदन केले. जगातील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होणाऱ्या समावेशक मॅरेथॉनपैकी एक म्हणून मुंबई मॅरेथॉनने वेगळी ओळख निर्माण केली असून, या स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना मिळणारी चालना हीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई मॅरेथॉन ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती यांचा संगम बनली आहे. दरवर्षी हजारो व्यावसायिक आणि हौशी धावपटूंसह विविध वयोगटांतील नागरिक या स्पर्धेत सहभागी होत असतात. त्यामुळे देश-विदेशातील धावपटूंमध्ये या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह, तसेच मॅरेथॉनच्या प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याने देशभरातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईच्या क्रीडा परंपरेला अधिक बळ देतानाच सामाजिक उपक्रमांना चालना देण्याची परंपरा यंदाही कायम राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

