वाशी रेल्वे स्थानक परिसरातील दुकानावर छापा; बीआयएस कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू होणार
नवी मुंबई, दि. ३१ : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि बाजारात विक्री होणाऱ्या उत्पादनांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नवी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. वाशी रेल्वे स्थानक परिसरातील एका दुकानावर टाकलेल्या छाप्यात अवैध बीआयएस नोंदणी चिन्हांचा वापर करण्यात आलेली विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने जप्त करण्यात आली असून, संबंधित कंपनीविरुद्ध भारतीय मानक ब्युरो कायदा, २०१६ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने दि. ३० जुलै २०२६ रोजी वाशी रेल्वे स्थानकावरील मे. वोन एन्टरप्रायझेस/व्हीएचएच कम्युनिकेशन या दुकानावर शोध आणि जप्ती मोहीम राबवली. बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर रोखणे आणि ग्राहकांचे हित जपणे या उद्देशाने ही अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.
बारा इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
या कारवाईत रिअलमी आणि एमआय ब्रँडच्या पॉवरबँक, लुनो ब्रँडचे वायरलेस हेडसेट तसेच बोट आणि रिअलमी ब्रँडचे इयरबड्स अशा एकूण १२ इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा साठा जप्त करण्यात आला.
तपासणीदरम्यान या उत्पादनांवर नमूद करण्यात आलेले बीआयएस नोंदणी क्रमांक वैध नसल्याचे निदर्शनास आले. काही उत्पादनांवर वापरण्यात आलेले नोंदणी क्रमांक प्रत्यक्षात इतर उत्पादनांसाठी मंजूर करण्यात आलेले असल्याचे आढळले, तर काही उत्पादनांचे उपप्रकार संबंधित बीआयएस नोंदणीच्या कक्षेतच येत नसल्याचे स्पष्ट झाले.
कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन
अवैध बीआयएस नोंदणी चिन्हे असलेल्या पॉवरबँक, वायरलेस हेडसेट आणि इयरबड्सचा साठा करून त्यांची विक्रीसाठी उपलब्धता ठेवणे हे भारतीय मानक ब्युरो कायदा, २०१६ मधील कलम १७ चे उल्लंघन असल्याचे बीआयएसने नमूद केले आहे. याप्रकरणी कलम २९ सह कलम १७ मधील तरतुदींनुसार संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दोषींना कठोर शिक्षेची तरतूद
बीआयएस कायद्यानुसार मानक चिन्हाचा गैरवापर सिद्ध झाल्यास दोषींना दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा पहिल्या उल्लंघनासाठी किमान २ लाख रुपयांचा दंड, तर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी किमान ५ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय सक्षम न्यायालयाच्या निर्णयानुसार अवैध मानक चिन्ह असलेल्या वस्तूंच्या किंमतीच्या दहा पटांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात.
ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन
बनावट किंवा अवैध बीआयएस नोंदणी चिन्ह असलेल्या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय मानक ब्युरो नियमितपणे बाजारपेठेवर देखरेख ठेवत असून, विश्वासार्ह माहितीनुसार शोध आणि जप्ती मोहिमा राबवत आहे. ग्राहकांचे हित सुरक्षित ठेवणे आणि उत्पादनांच्या दर्जाबाबत कायद्याचे पालन सुनिश्चित करणे हा या मोहिमांचा मुख्य उद्देश असल्याचे ब्युरोने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी कोणतेही बीआयएस-प्रमाणित उत्पादन खरेदी करण्यापूर्वी बीआयएस केअर ॲप किंवा अधिकृत बीआयएस संकेतस्थळाच्या माध्यमातून संबंधित उत्पादनाची अस्सलता तपासून पाहावी. तसेच बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती आढळल्यास ती तातडीने भारतीय मानक ब्युरोकडे नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
