प्रशासनाकडून तातडीने सुरक्षित स्थलांतर
मुंबई, दि. ४ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नावली गाव परिसराला बसला असून, गावाच्या वरच्या बाजूचा जमिनीचा काही भाग अतिवृष्टीमुळे खचल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत झाडांसह मातीचा मोठा मलबा खाली घसरून रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी रवाना करून मलबा हटविण्याचे काम सुरू केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे की, या घटनेमुळे नावली गावाला कोणताही तातडीचा धोका निर्माण झालेला नाही. काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सततच्या अतिवृष्टीमुळे गावाच्या उंच भागातील जमिनीचा काही भाग झाडांसह घसरून खाली आला. या भागात गावाची पाण्याची टाकी असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पाण्याच्या टाकीची सुरक्षितता तपासण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले असून संरचनेची सविस्तर पाहणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार पुढील संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग समन्वयाने काम करत आहेत. प्रशासनाने संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही गती दिली आहे.
घटनास्थळी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
घटनास्थळाच्या जवळ एकूण चार घरे असून त्यापैकी एक घर पूर्णपणे बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उर्वरित तीन घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने डोंगराळ भाग, घाटरस्ते आणि भूस्खलनाची शक्यता असलेल्या परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, नावली गाव सुरक्षित असून परिस्थिती पूर्णपणे प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि अधिकृत शासकीय माध्यमांतूनच माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

