Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सगळंच शांत झालंय…’ती’ चा आक्रोश ऐका

सगळंच शांत झालंय…

आज माझा दहावा वाढदिवस. सकाळपासूनच मी खूप आनंदात होती. आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी सर्वजण माझ्यासाठी मस्त गिफ्टस् घेऊन येणार होते. या एकाच कारणामुळे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत असते. आई व मावशी दोघी मिळून माझ्यासाठी फेवरेट चॉकलेट केक बनवणार होत्या. खरंतर आज माझा शाळेत जायचा मूड अजिबात नव्हता. पण आजोबांनी आणलेला नवीन गुलाबी रंगाचा ड्रेस मला शाळेत घालून मिरवायचे होते. आजोबांच्या मते, मी या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये परीसारखी दिसत होती. शाळेत निघताना आजीने माझे औक्षण केले. कोणाची नजर लागू नये म्हणून माझी दृष्ट देखील काढली. मला खूप गंमत वाटली.

शाळेत आज माझा भाव थोडा जास्तच वाढला होता. प्रेयरच्या वेळी अंजू टिचरने माझा वाढदिवस साजरा केला. आईने दिलेले चॉकलेटस् मी सर्वांना वाटले. आज माझा मूड काही अभ्यासात नव्हता. खिडकिबाहेरच्या जगात मी रमले होते. मोठं होण्याची स्वप्न बघत होते. ना अभ्यासाच टेन्शन ना परीक्षेचं मस्त भटका, जॉबला जा पैसे कमवा. कोणी ओरडणार नाही, आईचा मार नाही कित्ती कित्ती मज्जा… मला पण लवकर मोठं व्हायचं आहे. देवा जर प्रत्येक महिन्याला माझा वाढदिवस आला तर किती मज्जा येईल ना…म्हणजे त्यादिवशी मी मला हवं तसं जगेल. मला खूप खेळायचं आहे. आई बाबांसोबत चौपाटीला जायचं आहे. समुद्रातील पाणी हाताने उंच उडवायचे आहे. चटपटीत भेळ खात घोडेस्वारी करायची आहे… तेवढ्यात अचानक बेल वाजली व शाळा सुटली मी माझ्या स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आली. पटकन बॅग भरली आणि सर्वांच्या आधी पळत जाऊन बसमध्ये बसली. माझ्यासाठी कोण कोण काय काय गिफ्ट आणेल? या विचाराने आनंदून गेले.

पण आज घरचा रस्ता जरा जास्तच दूर वाटू लागला. मी व बसमधील दोन काका सोडून बसमध्ये कोणीच राहिले नव्हते. सोनी, पिंकू कधीच बसमधून उतरले होते. बसमधील कंडक्टर काका आता माझ्या बाजूला येऊन बसले. मांडीवर बसण्याचा आग्रह करू लागले. पोटाला घट्ट आवळून मला ते रस्त्यावरच्या गमती दाखवू लागले. मला मात्र घरी जाऊन केक कापायचा होता. तसं मी त्यांना म्हंटले सुद्धा, मात्र लवकरच जाऊ असं म्हणत त्यांनी माझे मुके घ्यायला सुरूवात केली. मला त्या काकांचा तो स्पर्श नकोसा वाटत होता. त्यांचा हात अंगभर फिरू लागला होता. मी ओरडायला सुरूवात केली… मला घरी जायचंय… सोडा माला… त्यांनी खिशातून रूमाल काढत माझ्या तोंडात कोंबला. आणि ते ड्रायव्हर काकांशी बोलू लागले. गाडी बाजूला घे असं सारखं बोलू लागले. गाडी थांबली. आता मला घरी सोडतील असं वाटलं. पण……

मला मागच्या सीटवर झोपवून, माझा नवा कोरा गुलाबी ड्रेस फाडायला सुरूवात केली. अहो… आजोबांनी दिलाय तो मला, माझा फेवरेट आहे… नका ना फाडू… घसा सुका पडेपर्यंत मी ओरडत होती. आजोबांंची परी हळूहळू उध्वस्त होत होती. पण त्या काकांनी माझा ड्रेस का फाडला असेल? एवढा सुंदर ड्रेस त्यांना नसेल का आवडला? माझ्या उघड्या अंगावर हात फिरवत, मुके घेत त्यांनी चावायला सुरूवात केली. ड्राईव्हर काका तर जोरजोरात चावत होते. मला खूप दुखत होतं. मी ओरडत होते, हात-पाय मारत होती पण त्यांनी सोडलं नाही. रडू तोंडातल्या तोंडात दाबत मी दोन्ही काकांसमोर हात जोडले. आजी नेहमी सांगायची मोठ्या माणसांना हात जोडून नमस्कार केल्याने देव आपल्यावर आनंदी होतो आणि आपण मागू ते देतो. मात्र काका काही केल्या सोडत नव्हते.

तेवढ्यात ड्रायव्हर काका माझ्या अंगावर झोपले. ड्रायव्हर काकांनी माझ्या सूसूच्या जागी काहीतरी टाकले. मी कळवळली. मी जोरात हंबरडा फोडला. शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या. सर्व ताकद एकवटून त्यांना जोरात पायने लाथ मारली. त्यांनी माझ्या कानशिलात लगावली. पायाला रक्त लागलं होतं. रक्त का आलं? कुठून आलं? मी अजूनच घाबरले. मला काहीच कळत नव्हतं. शरीराची हालचाल हळूहळू कमी झाली. काका नको ना plz, मला खूप त्रास होतो…काका plz थांबवाना, मला घरी जायचंय…माझा बर्थडे आहे असं पुटपुटले… त्या दोन्ही काकांनी माझ्या पूर्ण शरीराचा चावा घेतल्याने, नख ओरबडल्याने आता माझेे शरीर खूप विचित्र दिसु लागले. हळूहळू माझ्या शरीराची हालचाल कमी होऊ लागली. ते मला त्या काळ्याकुट अंधारात एकटीला सोडून निघून गेले. डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नव्हते, पोटाचे दुखणे वाढत चालले होते. अंग रक्ताने माखले होते. काकांनी ड्रेस फाडून टाकल्याने अंगावर काहीच कपडे नव्हते…डोळ्यावर अंधारी आली…हळूहळू सगळंच शांत झालं…

आजही आजोबाची परी, आई-बाबाची लाडकी लेक, भावाची नटखट बहिण अंधारात चाचपडत आहे. या क्रूर समाजाला आर्त हाक देत आहे. आज स्त्रीला बचावाचे धडे देण्याचे नाही तर पुरूषांना त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. एका स्त्रीचे अस्तित्व तिच्या योनीपुरता मर्यादित नाही याची जाणीव करून देण्याची खरी गरज आहे.

– सोनाली केदू भवर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *