Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते प्रकाशित

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते प्रकाशित

प्रसाद कुमठेकर यांच्या बहुचर्चित ‘बगळा’ या कादंबरीचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते लातूर येथे पार पडला. हा सोहळा अनेक अर्थाने वेगळा ठरला. पर्यावरणाचा काटेकोर विचार करून आयोजित केलेला हा उपक्रम मराठी साहित्यातील पहिलाच प्रयोग असावा. बॅनर, पत्रिका, प्लास्टिक मटेरियल न वापरता. तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांना स्वतःची गाडी आणावी लागू नये; किंबहुना ते चालत येऊ शकतील अशा अंतरावरून आमंत्रित करण्यात आलेले होते. प्रकाशनासाठी पॅकिंग केले जाणारे पुस्तके प्लॅस्टिकमध्ये न ठेवता कापडात गुंडाळण्यात आलेले होते. प्रकाशनसुद्धा  ‘चंद्रमौळी’ या अतुल देऊळगावकर यांच्या निवासस्थानी झाले जे लॉरी बेकर यांच्या संकल्पनेनुसार उभारलेले आहे. ज्यात सिमेंटवाळूचा अतिरिक्त उपयोग न करता जास्तीतजास्त स्थानिक साधनांचा उपयोग केला आहे.  अगदी मोजक्या  लोकांच्या सानिध्यात झालेल्या या प्रकाशनाला एफबी लाईव्ह करण्यात आले. आणि त्याला उत्तम प्रतिसाददेखील मिळाला.
प्रसाद कुमठेकर यांच्या बगळा कादंबरीची प्रथम आवृत्ती सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीतील बहू निवेदनशैली आणि मराठवाडी बोलीचा प्रभावी वापर त्यामुळे सुरुवातीपासून चर्चेत आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेली ही कलाकृती भाषेच्या अंगाने महाराष्ट्रभरातील अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी अभ्यासत आहेत.
 या कार्यक्रमात बोलताना  अतुल देऊळगावकर यांनी अतिशय चौकस आणि चतुरस्त्र मत मांडलं. ते म्हणाले खेड्यात वावरताना जी माणसाची औपचारिकता असते त्यात चलाखी, लबाडी येतेच; पण त्यातून एक विनोद निर्माण होतो. आणि तो विनोद नेमका टिपण्याची दृष्टी लेखकाकडे असावी लागते. मग अगदी साध्या लेखनातूनसुद्धा मौलिक साहित्य निर्माण होऊ शकतं. आणि तो साधेपणा प्रसाद कुमठेकर यांनी जपलेला आहे. याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आज चहुबाजूने निसर्गाची हेळसांड होत असताना आपण माणूस म्हणून खूपच तोकडे पडत आहोत. ते थोपवण्यासाठी कमालीचे अपुरे पडत आहोत. याचं कारण पर्यावरणाचं तळं आधी आपल्या मनातून आटलेलं आहे आणि मग निसर्गातून. अशी खंत यावेळी देऊळगावकर यांनी व्यक्त केली.
‘अनकंडिशनल लोकल विजडम’ अर्थात संसर्गरहित स्थानिक कुशलता या संकल्पनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्या-त्या प्रदेशातील मातीतून आलेलं एक खास टॅलेंट असतंच आणि त्या टॅलेंटचा जर खुबीने वापर केला तर ते वैश्विक होतं. दर्जेदार होतं. म्हणून बरंच स्थानिक भाषेत निर्माण झालेलं साहित्य जागतिक आघाडीवर पोचलेलं आहे. आणि या अंगानं प्रसाद कुमठेकर यांनी  मराठवाड्यात शेषराव मोहिते, आसाराम लोमटे यांच्या नंतर आपला वेगळा असा ठाशीव ठसा निर्माण केलेला आहे. तो येत्या काळात अधिक ठसठशीत व्हावा अशी आशा व्यक्त करत अधिकाधिक दर्जेदार साहित्यकृती घडत राहोत या  शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *