जाणून घ्या कट्टर शिवसैनिकांचा का आहे ‘या’ नेत्यांवर विशेष राग …
आज शिवसेना सत्तेत आहे आणि सेनेतील कथित बडव्यांच्या जोडीला असलेली इतर मंडळी सत्तेत मंत्रीपदी आहेत किंवा पक्ष संघटनेत महत्वाच्या भूमिकेत आहेत. पण हीच मंडळी जुन्या तसेच नव्याने राजकीय क्षितिजावर आलेल्या सामान्य शिवसैनिकांसाठी पक्षात आपलं स्थान बळकट करण्यात मोठा अडसर ठरत आहेत. यातील प्रत्येक नेत्याबाबत शिवसैनिकांच्या काही न काही तक्रारी सदैव असतातच. यात सर्वात वरचं नाव संजय राऊत यांचं घेतलं जाऊ शकतं. कधीकाळी एका साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणाऱ्या या पत्रकाराला राज ठाकरे ‘सामनात’ काय घेऊन येतात आणि नंतर हाच पत्रकार याच सामनाचा कार्यकारी संपादक काय होतो व पुढे राज्यसभा खासदार ते शिवसेना नेतेपदापर्यंत मजल मारतो. सारंच अचंबित करणारं. राजकीय क्षितिजावर फारच कमी वेळात जास्त ‘उंची’ झेप घेणाऱ्यांत राऊत यांचा वरचा क्रमांक लागतो. ही झाली एक बाजू दुसरी बाजू बरीचंशी वादग्रस्तच म्हणावी.
सेनेच्या विशेषतः मातोश्री च्या जुन्या वर्तुळात खासगीत सांगितले जाते की जेव्हा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे दिवंगत बाळासाहेबांना ‘सामना’चे अग्रलेख लिहिणे शक्य नव्हेत त्यावेळी संजय राऊत हे अग्रलेख त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून घेत परंतू अनेकदा त्यांच्याकडून काही वेगळंच मांडलं जायचं व अशावेळी बाळासाहेब त्यांच्यावर अक्षरशः भडकायचे. त्याचा एक नमुना क्रिकेट चा देव असलेल्या सचिन तेंडुलकरवर झालेल्या सामनातील टीकेच्या वेळीही सर्वांना पाहायला मिळाला होता. यावेळी खुद्द बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत सर्वांसमक्ष आपण असे काही संजय राऊत यांना लिहिण्यास सांगितलेच नव्हते असे म्हंटले होते.
अनेक जुन्या-नव्या शिवसैनिकांचा संजय राऊतांवर असाही आक्षेप आहे की त्यांनी शरद पवारांशी जवळीक साधून सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलं असून भविष्यात जर सेनेला गळती लागली तर सर्वात आधी संजय राऊतच राष्ट्रवादीत उडी मारतील.
२००४ सालापासून केंद्रात खासदारकी भूषवणाऱ्या राऊत यांना दिल्लीत विशेषतः उत्तर भारतात सेनेचा विशेष दबदबा निर्माण करता आलेला नाही. फक्त माध्यमांसमोर येऊन बाळासाहेबांच्या शैलीत बोलणे, थोडीशी शेरो-शायरी करणे हीच त्यांची या कारकिर्दीतील उपलब्धी. त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच अशा अनेक उपाधी शिवसैनिकांकडून देण्यात आलेल्या आहेत पण मुळात सेनेने सत्तेत सामील होऊन फार मोठी घोडचूक केलेली आहे याची अनुभूती आता त्याच सैनिकांना येत आहे.
मुळात संघटनात्मक बांधणीचं कौशल्य नसलेली व्यक्ती सेनेच्या नेतेपदी एवढि वर्ष कशी राहू शकते हे मोठं कोडं आहे. संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत २०१९ साली विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आलेले आहेत. या ठिकाणीही जुन्या व निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोक्यावर पाय ठेवत त्यांनी बंधू संजय राऊत यांच्या आशिर्वादाने निवडणूकीचे तिकीट मिळविले. मुळात या विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत यांच्यापेक्षा अनेक लायक उमेदवार सेनेकडे होते पण संजय राऊत यांची मातोश्रीवर असलेली मोहिनी कामी आली. असे हे शिवसेनेचे ‘संजय’ राष्ट्रवादीच्या ‘पवारां’च्या सिल्वर ओक वर वेळोवेळी हजेरी लावत असतात तर कधी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख खासदार युवराज संभाजी छत्रपती यांच्यावर ते वारंवार तिरके बाण मारत असतात. अशात एकदा भडकलेल्या खा. संभाजीराजेंनी संजय राऊत यांचा ‘संज्या’ असा एकेरी उल्लेख केला होता. तर एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी “संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत राहा” म्हणत जहरी टीका देखील केली होती. खासदार राऊत यांचा बोलघेवडेपणा सेनेला भविष्यात नक्कीच मोठ्या अडचणीत आणू शकतो.
२) सुभाष देसाई : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे जुने शिलेदार. बरीच वर्षे पक्षाची सूत्रे हाती असल्यामुळे त्यांच्यावरही जुन्या सैनिकांचा विशेष राग आहे. सुभाष देसाई म्हणजे सेनेचे चाणक्य म्हणवले जातात, ज्यांची बड्या-बड्या नेत्यांची शिवसैनिकांच्या भाषेत सांगायचं तर ‘खाट’ टाकली. मागील भाजप-सेना सरकार व आताच्या महाविकास आघाडी सरकार मध्येही त्यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. या खात्याचे मंत्री भलेही देसाई असले तरी त्यांचे सुपुत्र भूषण देसाई यांचीच येथे चलती असते असे म्हटले जाते. त्यांच्या शब्दाशिवाय इथलं साधं पानही हलत नाही. तर, या भूषण देसाई यांचं नाव कोणत्या न कोणत्या वादात येत राहीलं आहे. नुकतेच मुंबईतील वांद्रे परिसरात ३३ कोटींचं आलिशान घर घेतल्यामुळे उठलेल्या वादळात त्यांचं नाव पुढे आलं.
मुंबईतील मेकर टॉवर येथे पंचतारांकित कार्यालय असलेले भूषण देसाई असा कोणता व्यवसाय करतात की ३२ कोटी रुपयांचे मूल्य असलेले घर त्यांना घेता आले? असा रोकडा सवाल भाजपकडून वेळोवेळी विचारण्यात येतो. शिवाय २०११ साली खालापूर येथील एका फार्म हाऊस वर चालू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी भूषण देसाई हेही तिथे उपस्थित असल्याचा आरोप तत्कालीन उद्योगमंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांनी केला विधानसभेत केला होता. सुभाष देसाई यांच्या उद्योग खात्यामार्फत किती शिवसैनिक उद्योजक बनले हे मोठं कोडं आहे.
३) मिलिंद नार्वेकर : कधीकाळी उद्धव ठाकरे यांची सावली असलेले मिलिंद नार्वेकर हे सेनेतलं सर्वात मोठं वलयांकित परंतू वादग्रस्त नाव. उद्धव ठाकरे यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी आलेल्या शिवसेना गटप्रमुख नार्वेकर यांची थेट त्यांचे स्वीय सहाय्यकपदी वर्णी लागली. मातोश्रीच्या वर्तुळात असे सांगितले जाते की नारायण राणे यांच्या सेनेतील शेवटच्या मातोश्री भेटीत त्यांचा मिलिंद नार्वेकर यांच्याशी घनघोर वाद झाला होता आणि नारायण राणेंनी नार्वेकर यांना यावेळी धक्काबुक्की केली होती . यानंतरची कथा साऱ्यांना ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक झाल्यावर त्यांनी केलेली प्रगती ही डोळे दिपवणारी आहे. त्यांच्यावर वेळोवेळी निवडणुकांच्या काळात तिकिटासाठी व संघटनेतील नियुक्त्यांसाठी पैसे घेत असल्याचे नारायण राणेंसह अनेक नेत्यांनी आरोप केले.
राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक संजय पांडे यांची या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांच्या विरोधात ढीगभर पुरावे दिले होते ज्यात त्यांनी मिलिंद नार्वेकर व देवेन भारती यांच्या एकत्रित अनेक मालमत्तांचे तपशीलही दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रकरण गुलदस्यात ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या व विदेशातील बेनामी संपत्तीसह अनेक प्रकरणात मिलिंद नार्वेकर यांचे नाव सातत्याने पुढे येत असल्यामुळे त्यांना हळूहळू बाजूला केलं जातं असून उद्धव ठाकरे काही नवा पर्याय शोधत असल्याचे कळते.
४) अॅड. अनिल परब: सेनेच्या रिक्षा व केबल युनियन चा अध्यक्ष ते परिवहन मंत्री असा प्रवास केलेले पेशाने वकील (?) असलेले अॅड. अनिल परब यांची कमी काळात झालेली ‘प्रगतीही’ लक्षणीय अशीच म्हणावी. चार वेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या परब यांचे पक्ष वाढीतील योगदान हे नगण्यच म्हणावे. इतर वकिलांच्या आधारे सेनेच्या कायदेशीर बाजू सांभाळणे हेच त्यांचे सांगण्यासारखे कर्तृत्व. यापलीकडे अनिल परब कायम वादात राहिलेत. गेल्या वर्षी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अनिल परब यांच्यावर वांद्र्यातील कार्यालयासाठी म्हाडाची जागा बळकावल्याचा आरोप केला होता. शिवाय त्यांची आणखी प्रकरणंही बाहेर काढण्याची धमकी दिली होती. यात सध्या मानसुख हिरेन हत्या प्रकरण व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट जमीन खरेदी प्रकरणात बनावट सही केल्याचा आरोपही सोमैय्या यांनी केला आहे. यानंतर सुरू झालेल्या राजकीय कलगीतुऱ्यात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेत एका ट्विट मध्ये त्यांचा ‘स्पॉट नाना’ असा उल्लेख केला होता. अनिल परब यांच्यावरही भाजपकडून वेळोवेळी बेनामी संपत्ती संदर्भात आरोप होत राहिले आहेत.
त्यांच्या काळात वांद्रे ते अंधेरी पट्ट्यात सेनेची मोठी वाताहत झालेली पाहायला मिळते. या विभागात ‘भाजप’चं प्राबल्य असून खुद्द मातोश्री च्या दारात सेनेच्या नाकावर टिच्चून काँग्रेस चा आमदार निवडून आला आहे. शिवाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तर शिवसेनेची येथे जिंकून येण्याचीही कुवत आता उरली नाहीये. कधीकाळी ज्यांचा बोलबाला होता असे सेनेचे दिग्गज नेते मधुकर सरपोतदार, अतुल सरपोतदार, जयवंत परब व कामगार क्षेत्रात ज्यांचा दबदबा राहिलाय असे श्रीकांत सरमळकर आदी नेत्यांना अस्तित्वहीन करण्याची कामगिरी ऍड. अनिल परब यांनी खुबीने पार पाडली आहे अशी चर्चा आहे.
५) अनिल देसाई : अनिल देसाई हे शिवसेनेतील साहेबी व्यक्तिमत्त्व मानलं जातं. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून पुढे आलेला हा चेहरा. परंतू लोकांमधून निवडून येण्याची कुवत नसलेल्या या नेत्याने? लोढांच्या साथीने दक्षिण मुंबईतून शिवसेना हद्दपार केल्याची जुन्या-जाणत्या शिवसैनिकांची कायम तक्रार राहिली आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कान भरणे, सतत चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कट-कारस्थान रचून उद्धव ठाकरेंजवळ त्यांच्या तक्रारी करणे, जनाधार नसलेल्या स्वतःच्या चेल्या-चमच्यांची शिवसेनेत मोक्याच्या पदांवर वर्णी लावण्यासाठी आपल्या वजनाचा वापर करणे, अशाही नाराज सैनिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. अशा या काहीसा राखीव स्वभाव असलेल्या पक्षावाढीत विशेष योगदान नसलेल्या नेत्याला दोनदा राज्यसभेची खासदारकी मिळणं हे सैनिकांना पचण्यास जड जातंय.
६) आदेश बांदेकर : तमाम महाराष्ट्राला ‘भाऊजी’ म्हणून परिचित असलेले शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचा पत्ता कापत माहीम मतदारसंघातून त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळवले. यावेळी येथील शिवसैनिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष उसळला. सरवणकरांसारख्या कट्टर शिवसैनिकाला नाईलाजाने ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवावी लागली होती. या निवडणुकीत सेनेचे उमेदवार आदेश बांदेकर यांचा दारुण पराभव झाला सोबतच सदा सरवणकर यांनाही पराभवाचा धक्का बसत त्यांना ५ वर्ष अज्ञातवासात जावं लागलं होतं. यावेळी शिवसेना भवनाच्या दारातंच मनसेचे विद्यमान प्रवक्ते संदीप देशपांडे हे निवडून आले. हा झाला भूतकाळ.
आज बांदेकर यांचा सेना प्रवेश होऊन तब्बल १२ वर्ष उलटून गेली आहेत, परंतू याकाळातलं त्यांचं पक्ष वाढीतलं योगदान पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचीच गरज भासावी. काही काळापूर्वी आदेश बांदेकर यांची रायगड जिल्ह्याच्या संपर्क नेतेपदी वर्णी लागली होती. या ठिकाणी त्यांच्या कडून शिवसेना वृद्धीसाठी विशेष असे काही काम झाले नसल्याचे पाहायला मिळाले. उलट त्यांच्या एका विशेष ‘कामगिरी’ ची रश्मी ठाकरे यांनी खुद्द दखल घेत त्यांना व तेथील जिल्हाप्रमुखाला त्यांच्या पदावरून दूर केले गेले. यानंतर २०१४ सालानंतर भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांना श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. अशा या लोकांमधून निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नटाला फक्त सेनेच्या कार्यक्रमात निवेदकाची भूमिका पार पाडण्यासाठी एवढ्या मोठ्या पदावर बसवलंय का? असा भोळा सवाल संधी हुकलेले व वार्धक्याकडे झुकलेले सैनिक विचारतात.
७) वरुण सरदेसाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे सुपुत्र ही झाली शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांची प्राथमिक ओळख. अभियांत्रिकी ची पदवी प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम.एस. केलेले वरुण सरदेसाई मावस भाऊ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत पक्ष कार्यात सामील झाले. पक्षात त्यांच्या कार्यशैलीवर मोठ्या प्रमाणात नाराजी असून पक्षवाढीसाठी सक्षम कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यात त्यांना विशेष यश अद्याप लाभलेलं नाहीये. मुळात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या व घराणेशाहीची झुल पांघरलेल्या तरुणांकडून जास्त अपेक्षा ठेवणे व्यर्थ असे शिवसेनेतील जमिनीशी नाळ असलेले नेते खाजगीत बोलतात.
असे हे वरुण वाऱ्याच्या वेगाने राजकारणात आले व २०१९ साली आकारास आलेल्या सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक वादळांत अडकलेले रोजच्यारोज पाहायला मिळत आहेत. सर्वात आधी आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने कोणतेही वैधानिक पद नसताना शासकीय बैठकांना हजेरी लावल्यामुळे माध्यमांत चर्चेत आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. नुकतेच बाहेर आलेल्या अंटालिया बॉम्ब व मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर उठलेल्या राळीत भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी ते म्हणाले की आयपीएल मध्ये चालणाऱ्या बेटिंग वाल्यांकडून वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी १५० कोटी रुपयांची मागणी केली होती. यानंतर सरदेसाई यांनी वाझेंना फोन करून या ‘विषयातला’ आपला हिस्सा मागितल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला होता. या प्रकरणी सरदेसाई व वाझे यांदरम्यान झालेल्या फोन व व्हाट्सअप्प कॉल्स चे रेकॉर्डस् तपासण्याची मागणी नितेश राणे यांनी ‘एनआयए’कडे केली होती. दरम्यानच्या काळात वरुण सरदेसाई यांच्यावर आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना दबाव टाकण्यासाठी थेट कॉल करत असल्याचा व मुंबई महानगरपालिकेत टेंडर प्रक्रियेत लुडबुड करत असल्याचाही आरोप आ. नितेश राणे, भाजप नेते किरीट सोमैय्या व इतर मंडळी वेळोवेळी करत असतात.
किचन कॅबिनेट – शिवसेनेच्या वर्तुळात ज्याची चवीने चर्चा केली जाते त्या ‘किचन कॅबिनेट’ ची माहिती घेतल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या महिला नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचं. किशोरी पेडणेकर या सध्या अनके वादांमध्ये घेरलेल्या पाहायला मिळतात. मुलाच्या नावाने मुंबई महापालिकेचे कंत्राट मिळवल्याप्रकरणी व यात भ्रष्टाचार झाल्याबाबत त्यांच्यावर मध्यंतरी भाजपकडून आरोप झाले होते. सोबतीला भाजप नेते किरीट सोमैय्या यांनीही वरळीतील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या ‘एसआरए’ प्रकल्पातील घराबाबत आरोप केले होते. असे खाजगीत सांगितले जाते की महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यावर किशोरी पेडणेकर यांच्यामागे ईडी चे भूत भाजपकडून बसवले जाण्याची दाट शक्यता आहे.
माजी आमदार व विद्यमान नगरसेविका असलेल्या विशाखा राऊत या शिवसेनेतलं जुनं नाव. जेवणाच्या थाळीत एका बाजूला मीठ असावं असा त्यांचा सेनेतील वावर राहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शिवसेना दौऱ्यांदरम्यान त्या नजरेस आल्या आहेत. परंतू त्यांच्या उपस्थितीमुळे सेनेला किती फायदा झाला हे शोधण्याची आता वेळ निघून गेल्याचे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. त्यांच्याच जोडीला दक्षिण मुंबईतील शिवसेना उपनेत्या मीना कांबळी यांचंही नाव पुढे येतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दक्षिण मुंबईत शिवसेनेला महत्वाच्या काही जागा गमवाव्या लागल्या. त्याला मीना कांबळी यांची नेतृत्वशैली जबाबदार असल्याचे स्थानिक शिवसैनिक खाजगीत सांगतात. या तिन्ही महिला नेत्या मातोश्रीच्या निकटवर्तीय मानल्या जातात, ज्यांच्यावर रश्मी ठाकरे यांचे कान भरत असल्याचा आरोप इतर महिला आघाडी करत आलेल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील राजकारणात असेच कारकून नेते झाले. संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब, आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर असे असंख्य नामधारी नेते ज्यांची निवडणूक लढण्याची क्षमता नाही, ज्यांना चार माणसं ओळखत नाहीत, ज्यांच्या असण्याने शिवसेनेला कोणताही फायदा नाही आणि नसण्याने काही तोटा नाही अशा बडव्यांना, हुजऱ्यांना शिवसेनेत महत्व, मुक्त हस्त वावर आणि मोठमोठी पदे मिळत गेली हीच कट्टर शिवसैनिकांची बोच राहिली आहे. आणि तीच री आदित्य नेही ओढली आणि तसेच हुजरे जमा केले परिणामी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला चालली आहे.
अधिक रोचक माहितीसाठी पुढील लेख वाचा ….