पालखी सोहळा आणि शिवभक्तांच्या जयघोषाने गड शिवमय
रायगड, दि. ६ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५२ व्या वर्धापनदिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज पारंपरिक वैभव, इतिहासाची साक्ष आणि शिवभक्तीचा उत्साह यांचा संगम अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे भोसले, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय आमदार संजय चव्हाण, आमदार अभिजित पाटील, नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता नागारखान्यात पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहणाने झाली. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवचरित्र आणि स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. त्यापाठोपाठ युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीचा विधीवत अभिषेक करण्यात आला. राजसदरेवरील सिंहासनारूढ शिवमूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणानंतर पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.
राजसदरावरील मुख्य कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना संबोधित करताना शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पारंपरिक पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. ढोल-ताशे, लेझीम, मर्दानी खेळ, भगव्या पताका आणि शिवकालीन वेशभूषेतील मावळ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
पालखी सोहळा जगदीश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे धार्मिक विधी पार पडले. यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, पोवाडे, कीर्तन, लोककला सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्था, इतिहासप्रेमी संघटना, युवक मंडळे आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोफत बससेवा, अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, सावलीसाठी मंडप आणि आपत्कालीन मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह होळीचा माळ येथील नियंत्रण कक्ष, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, राजसदर तसेच अन्नछत्र परिसराची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी शिवभक्तांशी संवाद साधत त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हिंदवी स्वराज्याला अधिकृत स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचाही सोहळा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि राष्ट्राभिमान यांचे दर्शन घडवणारा ठरला.
स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेचा गौरव करणारा, शिवरायांच्या कार्याचा जागर करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा दुर्गराज रायगडावर अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

