सूचना फलकावर तपशील प्रदर्शित करणे बंधनकारक
मुंबई, दि. १५ : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काबाबत पारदर्शक आणि संपूर्ण माहिती मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. महाविद्यालयांनी प्रवेश शुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी तसेच इतर आकारण्यात येणाऱ्या शुल्कांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राज्यात नुकताच इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आणि पालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण तसेच राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या नियमांनुसारच शुल्क आकारावे. तसेच आकारण्यात येणाऱ्या सर्व शुल्कांची स्पष्ट माहिती प्रवेशपूर्व टप्प्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी राहणार आहे. यामध्ये प्रवेश शुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी, प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या शुल्कांचा तपशील समाविष्ट असणे आवश्यक आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, शुल्कासंदर्भातील माहिती महाविद्यालयाच्या प्रवेश माहितीपुस्तिकेतही अनिवार्यपणे नमूद करावी लागणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना ही माहिती प्रवेशापूर्वी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याचे प्रकार रोखले जातील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
महाविद्यालयांच्या सूचना फलकावर शुल्काची माहिती स्पष्टपणे दिसेल याची जबाबदारी संबंधित विद्यापीठे आणि विभागीय सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील सर्व संलग्नित आणि अधिनस्त महाविद्यालयांना या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी, लपविलेले शुल्क किंवा माहिती न देण्याबाबत तक्रारी प्राप्त होऊ नयेत यासाठीही महाविद्यालयांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शुल्कासंदर्भात कोणतीही तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालयाला जबाबदार धरले जाईल, असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रवेश प्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या शुल्क तपशीलाची खात्री करूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
