६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी
मुंबई, दि. ५ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जातील आवश्यक दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंदणी करण्यासाठी ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी नियमित दुसरी फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित दुसऱ्या फेरीसाठी ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जाचा भाग-१ दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असेल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज ‘लॉक’ करणे बंधनकारक राहणार आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात १० जून ते १२ जून २०२६ या कालावधीत प्रवेश वाटपाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर १३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता नियमित दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी, कट-ऑफ यादी तसेच इतर संबंधित माहिती अधिकृत प्रवेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेशाद्वारेही प्रवेशासंदर्भातील माहिती पाठविण्यात येईल.
दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १३ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांकडूनही प्रवेश मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
दुसऱ्या फेरीतील सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १८ जून २०२६ रोजी पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागांची अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य शासनाने यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर दिला असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीनुसार प्रवेश मिळावा, यासाठी केंद्रीकृत प्रवेश प्रणाली कार्यरत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सर्व विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती, सूचनापत्रे आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना अधिकृत प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी त्याचा लाभ घ्यावा, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
