“वादळी पावसामुळे राज्यातील सुमारे १ लाख ५०० एकर क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार” – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
बारामती, दि. ६ : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ जिल्ह्यांतील जवळपास १ लाख ५०० एकर क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी बाधित क्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडून आवश्यक मदत त्वरित उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बुद्रुक आणि लाखेवाडी या भागांमध्ये जाऊन वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, हवामान बदलाच्या परिणामामुळे राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या घटनांमध्ये वाढ होत असून याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक भागांत उभ्या पिकांचे, फळबागांचे आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने काम करून एकाही शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित राहू देऊ नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने सक्रियपणे कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्यक ती सर्व मदत देण्यास कटिबद्ध आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना’ मंजूर केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत मिळणार आहे.
यापुढे शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी कृषी उत्पादन वाढ, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, पीक विमा योजनांचा विस्तार आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत देण्याची प्रक्रिया गतीने राबविली जाणार आहे.
राज्यातील शेतकरी वर्गाला नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
