ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
लाभार्थ्यांच्या याद्या विविध माध्यमांतून उपलब्ध
योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड केली असून, त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत.
याशिवाय, लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँकांच्या शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचे नाव सहज तपासता येणार आहे.
प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार स्वतंत्र ओळख क्रमांक
योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक किंवा या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार आहे.
राज्यभरातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सहज पूर्ण करता यावी यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरणानंतर डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार
ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभ वितरणात पारदर्शकता राखली जाणार असून, रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल.
“पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी”
योजनेबाबत माहिती देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, “पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.”
तसेच त्यांनी सांगितले की, “ही योजना केवळ कर्जमुक्ती पुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीने शेतीसाठी बळ देणारी योजना आहे.”
शेतकऱ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
राज्य शासनाने पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब होऊ नये यासाठी तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित केली असून, यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर अथवा संबंधित ग्रामपंचायत, सहकारी संस्था किंवा बँक शाखेतून माहिती घेऊन आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळण्याबरोबरच शेतीसाठी नव्याने आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
