कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश
नवी दिल्ली, दि. २५: आजची तरुण पिढी आणि त्यातही जेन-झी पिढी काय करू शकते याचा नमुना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर ते मुंबईतील शिवाजी पार्क पर्यंत पाहायला मिळाला. पण या दबावामुळे अखेर देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा देण्यास भाग पाडले. थोड्याच वेळापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी स्वतः एक पोस्ट करत आपला शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. मागील जवळपास महिन्याभरापेक्षा जास्त दिवस कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढाकाराने नीट परीक्षांतील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं. दिनांक १८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यावर आंदोलनाची धग वाढली व २० जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जमुळे तर याचं रूपांतर वणव्यात झालं. हा वणवा देशभर पसरला. मुंबई, पुणे, कोलकाता, जयपूर तसेच दक्षिणेतील शहरांत जाऊन पोहोचला. नीट पेपर लीक प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. याची परिणती आज अखेर शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यात झाली. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक व जंतरमंतर वर उपस्थित आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला.
