पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडेही करण्यात आला होता पाठपुरावा
पनवेल, दि. २२ : पनवेल महानगरपालिकेतील दिवाळी बोनस पासून वंचित राहिलेल्या आरोग्य सेवेतील वॉर्डबॉय आदि कर्मचार्यांच्या खात्यात अखेर बोनस ची रक्कम जमा झाली आहे. महाराष्ट्र वार्ता ने ऐन दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी एक बातमी प्रसारित करत पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचे लक्ष वेधले होते. परंतु, दिवाळी सरून ही कोणतीच हालचाल न झाल्यामुळे अखेर महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला. यावेळी मनुष्यबळ कंत्राटदार ‘गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कडून आरोग्य सेवेतील कर्मचार्यांवर केल्या जात असलेल्या दुजाभावाबाबत संबंधित अधिकार्यांना अवगत करण्यात आले. ‘वरून’ दबाव आल्यामुळे अखेर नमतं घेत कंत्राटदाराने आरोग्य सेवेतील वंचित कर्मचार्यांच्या खात्यात बोनसचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली.
दिवाळीपूर्वी पनवेल महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरवठा करणार्या ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदार कंपनीने महापालिकेतील आपल्या विविध विभागातील कर्मचार्यांना बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले होते. यात आस्थापना विभागातील २२७, फायरमान विभागातील ४२ तर पाणीपुरवठा विभागातील १०४ अशा अंदाजे ३७३ कर्मचार्यांना दिवाळी बोनस चे वाटप करण्यात आले. परंतु, हे होत असताना पनवेल महापालिका हद्दीतील जवळपास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वॉर्ड बॉय आदि कर्मचार्यांना बोनस अदा न करता कंत्राटदार व पालिकेने त्यांना अक्षरशः वार्यावर सोडल्याचे पाहायला मिळाले. शेवटी कोणीच वाली न उरल्याने बोनस पासून वंचित कर्मचार्यांनी महाराष्ट्र वार्ता च्या सामाजिक उपक्रम राबवणार्या ‘आपली समस्या’ टीम शी संपर्क साधत आपली व्यथा त्यांना कथन केली. जवळपास महिन्याभराच्या पाठपुराव्यानंतर आपली समस्या टीम ने आरोग्य सेवेतील या वंचित कर्मचार्यांना हक्काचा बोनस मिळवून देत त्यांच्या चेहर्यावर हास्य उमटवलं.
आधीची बातमी
कोविड काळात आरोग्य सेवेतील कर्मचार्यांनी बजावलेले कर्तव्य पालिका अधिकारी इतक्यात कसे विसरले हा मोठा सवाल आहे. आरोग्य सेवेतील ही मंडळी प्राथमिक स्वरुपाच्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद ई. च्या अखत्यारीत असेलल्या प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र, रुग्णालये अशात कर्तव्य बजावत असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचार्यांना मिळणार्या सोयी-सुविधांचे एक ऑडिट करणे गरजेचे आहे. अन्यथा इतरांची सेवा करणार्या या ‘देवदूतां’च्या नशिबी उपेक्षाच येत राहील.
टीप: अद्यापही दिवाळी बोनस प्राप्त न झालेले ‘पनवेल मनपा’तील आरोग्य सेवेतील कर्मचारी महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क करू शकतात. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल.