मुंबई सीएसएमटी-पनवेल रेल्वे मार्गावरील बेशिस्त मुजोरांमुळे सामान्य प्रवाशांना होतोय मनस्ताप
नवी मुंबई/पनवेल, दि. १३: वेळ दुपारी बरोबर ३ वाजताची, ठिकाण – हार्बर रेल्वे मार्गावरचं चुनाभट्टी रेल्वे स्थानक. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन २.३४ वाजता पनवेल च्या दिशेने चाललेल्या रेल्वेच्या पुढून दुसर्या-तिसर्या डब्यात एक तरुण प्रवासी बॅग घेऊन आत शिरतो. आत आल्यावर तो थेट आपली बॅग रॅक वर ठेवतो व बाजूलाच एका माणसाची बसण्याची जागा व्यापून त्यावर थर्माकॉल चा मोठाला बॉक्स ठेवलेल्या व्यक्तीला त्याचा बॉक्स खाली ठेवण्याची विनंती करतो! झालं बॉक्स खिडकीजवळ च्या सीट वर ठेवलेल्या त्या टिकोजी रावांचा अहंकार दुखावतो व ते थेट सीट रिकामी करण्यास नकार देतात. तरुण त्या मुजोर व्यक्तिला ही सीट प्रवाशांना बसण्यासाठी आहे याची आठवण करून देतो. पण ही व्यक्ति आपली हेकडी सोडण्यास तयार होत नाही. अखेर तरुण त्या बॉक्ससह व्यक्तीचा फोटो काढतो व महाराष्ट्र वार्ता च्या ट्वीटर हॅंडल मार्फत ट्वीट करतो. अखेर हा मुजोर प्रवासी नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकात त्याचा प्रवास संपावतो!
हे सध्या रेल्वे प्रवासातले नित्याचेच चित्र आहे. त्यात विशेषतः छोट्या-छोट्या बाबींवरून सामान्य प्रवाशांसोबत आडकाठी करणे, मोठ्या आकारमानाचं सामना लगेज च्या बोगितून न नेता प्रवासी डब्यात सोबत घेऊन इतरांना त्रास होईल असे वर्तन करणे, घरी कोचावर-सोफ्यावर पाय लांब करून बसावे तसे सीट वर घाणेरडे पाय ठेऊन बसणे शिवाय मोबाईलवर मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहणे, गाणी ऐकणे असले प्रकार हार्बर मार्गावर बेशिस्त प्रवाशांकडून होत असलेले वरचे वर पाहायला मिळतात. हे प्रकार करणार्यांत सर्व प्रांतातील बेशिस्त लोकांचा भरणा आहे हे विशेष!(मराठी माणूस मराठी माणसाशी बहुतेक सध्या उपनगरीय रेल्वेतच भांडत असावा) सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन करावे याचे जराही भान नसलेल्या अशा बेशिस्त प्रवाशांवर आळा घालण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून आरपीएफ कडून चालूच आहे. पण ही जबाबदारी फक्त रेल्वे पोलिसांचीच आहे का? या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून रेल्वे-बस आदि सार्वजनिक उपक्रमातील वाहनांतून प्रवास करताना आपले वर्तन हे दुसर्याला त्रासदायक ठरणार नाही याचे भान आपल्याला का नसावे? देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्ष उलटली तरीही आपल्यात एवढीहि शिस्त असू नये का? असे अनेक प्रश्न उद्भवतात. फोटोत आपण पाहत असलेल्या व्यक्तीबाबत जर बोलायचे झाले तर त्यालाच जर सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याची शिस्त नसेल व याही पेक्षा जास्त कठोर बोलायचे झाल्यास ‘अक्कल’ नसेल तर तो आपल्या पुढच्या पिढीला काय वळण लावणार, तिला कोणती दिशा देणार हे मोठ कोडंच आहे.
जर मुजोर प्रवाशांशी सामना करण्याची वेळ आली तर ही काळजी घ्या
- एक दोनदा विनंती करूनही जर मुजोर प्रवासी दाद देत नसेल तर त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. सर्वात आधी पुरावा म्हणून त्या ठिकाणाचा फोटो काढावा. यानंतर गूगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध होणार्या स्पाय एप्प किंवा फेसबूक लाईव मार्फत आपण व्हिडियो रेकॉर्डिंग करू शकता. जेणेकरून समोरच्या प्रवाशाने उलट आपलीच खोटी तक्रार केली तर निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याजवळ एक पुरावा उपलब्ध राहील.
- अशा वेळी मुजोर प्रवाशापासून थोडे अंतर राखून उभे राहावे व १३९ वर कॉल करून रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सर्व घटनाक्रम सांगावा. त्यांना तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा जेणेकरून त्यांना तुमच्याशी संपर्क साधणे सोप्पे जाईल व वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचता येईल.
- जास्त माणसं असल्यास उगाच जाऊन हिरोगिरी ही करू नये. थोडं चतुर चाणक्य होऊन १३९ वर कॉल करून जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे. अशा वेळी ट्वीटर चा वापर करून रेल्वे पोलिसांसह काही माध्यमांना ही टॅग करावे जेणेकरून प्रशासनावर दाबवही ठेवता येईल.
अशा मुजोर प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची रेल्वे पोलिस, रेल्वे प्रशासन यांची तयारी आहे असे एक आशावादी चित्र सध्या आहे. यासाठी सामान्य प्रवाशांनी पुढाकार घेत ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून अशा मुजोर व बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी जास्तीत-जास्त तक्रारी करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात तर हे काम आणखी सोप्पे झाले आहे. यासाठी चोवीस तास आपल्या हातात असलेल्या स्मार्ट फोन चा वापर करत पुढील प्रमाणे आपण रेल्वे प्रवासात येणार्या समस्यांबाबत अधिकृतरित्या बसल्या जागेवरून तक्रार नोंदवू शकता.
- १३९ – या क्रमांकावर संपर्क साधून आपण तात्काळ रेल्वे पोलिसांकडे मदद मागू शकता. असंही होऊ शकतं की पुढच्या स्थानकात ट्रेन पोहोचताच रेल्वे पोलिस तुमच्या डब्यात हजर झालेले तुम्हाला पाहावयास मिळतील.
- ट्वीटर – जर तुम्ही ट्वीटर वर सक्रिय असाल तर तुम्ही तपशीलवार तक्रारीसह @RailwaySeva @RPFCRBB @RPFCR @rpfwr1 ला धावत्या ट्रेन मधुनही टॅग करून ट्वीट करू शकता. या मार्फत रेल्वे पोलिसांकडून तुम्हाला तात्काळ योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही त्यांनी मागणी केल्यावर खाजगीत मेसेजही करू शकता.
- रेल मदद – आपली तक्रार सविस्तर तपशील व फोटो सहित तुम्ही indianrailways.gov.in या पोर्टल वर नोंदवू शकता.