Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

परळ येथील महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

परळ येथील महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

मुंबई, दि. १३: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत परळ येथील कामगार मैदान येथे गुरुवारी झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी विविध उद्योग, कंपन्या, आस्थापनांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. १ हजार २०० उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. उर्वरित उमेदवारांनी कंपन्यांकडे नोंदणी केली असून पात्रतेनुसार त्यांना संधी मिळणार आहे. मेळाव्यात विविध ३१ कंपन्यांनी सहभागी होत त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी मुलाखती घेतल्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.

परळ येथील महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

“पाच लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट” – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मागील महिन्याभरात हा चौथा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.

एअरटेल, अथेना बीपीओ, फन अँड जॉय ॲट वर्क, करिअर एंट्री, मॅजिक बस, एसएम रिक्रूटमेंट, हिंदू रोजगार डॉट कॉम, उडान ५०५, कल्पवृक्ष प्रा. लि., जीएस जॉब सोल्यूशन, आरटीईसी प्रा. लि., सॅपिओ ॲनेलिटिका, कॅटेलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, बझवर्क्स, इंपेरेटिव्ह बिझनेस, मनी क्रिएशन, स्पॉटलाईट, टीएनएस एंटरप्राईजेस आदी विविध ३१ कंपन्या, उद्योग, आस्थापनांनी त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी या मेळाव्यात मुलाखती घेतल्या.

स्वयंरोजगारविषयक योजनांचे मार्गदर्शन

मेळाव्यामध्ये उमेदवारांना नोकरीविषयक विविध संधींबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्याचबरोबर बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याबाबतही माहिती देण्यात आली. उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये राज्य शासनाच्या विविध महामंडळांनी सहभाग घेतला. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *