Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशातील पहिल्या साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाट्न

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घेण्याची गरज

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील  व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली.  पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू, असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रीक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रीक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रीक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू.

राज्यातील विविध महानगरपालिकांचे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्त्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असेही ते म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, ऑक्सिजन निर्मितीसाठी डिस्टिलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यात पुरवठा केला जाऊ शकतो. इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.  कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन विकसित करण्यात आलेल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले.

  प्रकल्पाबाबत थोडक्यात

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर
  • ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना
  • दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार
  • ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *