देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी पुन्हा खंडित
नवी मुंबई/पनवेल, दि. २१ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. पनवेल तालुक्यातील देवद आणि विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत मुख्य जलवाहिनीवर करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडण्या तिसऱ्यांदा आढळून आल्यानंतर महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून त्या निष्कासित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असून संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे २०५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य भूमिगत जलवाहिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या नळजोडणी करून पाण्याचा वापर सुरू केल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता जलवाहिनीवर सुमारे १०० मिलिमीटर व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात प्रथम कारवाई एप्रिल २०२५ मध्ये करण्यात आली होती. त्या वेळी महापालिकेने अनधिकृत जोडणी तात्काळ खंडित करून देवद आणि विचुंबे ग्रामपंचायतींना बेकायदेशीररीत्या वापरलेल्या पाण्यापोटी ८० लाख ९२ हजार ५६० रुपये दंडात्मक रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावली होती.
यानंतर जानेवारी २०२६ मध्ये मुख्य जलवाहिनीवरील बिघाड दुरुस्तीच्या कामादरम्यान त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत नळजोडणी झाल्याचे निदर्शनास आले. सदर जोडणी काढण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले असता काही स्थानिकांकडून विरोध झाल्यामुळे तत्काळ कारवाई करणे शक्य झाले नव्हते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना जोडणी हटविण्याबाबत तसेच दंडाची रक्कम भरण्याबाबत पुन्हा नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नव्हती.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २८ मार्च २०२६ रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने दुसऱ्यांदा कारवाई करून अनधिकृत नळजोडणी खंडित केली होती. तथापि त्यानंतरच्या तपासणीत याच ठिकाणी पुन्हा जलवाहिनीशी छेडछाड करून पाणीचोरी सुरू असल्याचे उघड झाले.
महापालिकेच्या तपासात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अनधिकृत वापर झाल्याचे समोर आले. त्यानुसार बेकायदेशीररीत्या वापरण्यात आलेल्या पाण्याच्या मोबदल्यात १ कोटी १७ लाख ६१ हजार २३९ रुपये दंडात्मक रक्कम आकारण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेला कळविण्यात आले. तसेच संबंधित अनधिकृत जोडणी तातडीने काढून टाकण्याची सूचना करण्यात आली.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार १९ जून २०२६ रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून ते २० जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने तिसरी आणि निर्णायक कारवाई केली. या कारवाईत अनधिकृत नळजोडणी पूर्णपणे निष्कासित करण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने या ठिकाणी सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविली असून मुख्य जलवाहिनीशी पुन्हा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत खांदेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२६(अ), १२५, ३२४, ३(५) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ मधील कलम ३(२)(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुख्य जलवाहिनीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे, अनधिकृत नळजोडणी करणे किंवा पाणीचोरी करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अशा कृत्यांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर निरीक्षण आणि कायदेशीर कारवाईची मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.

