मुदतीस अवघे चार दिवस बाकी
नवी मुंबई, दि. २७ : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत तब्बल ८१ कोटी रुपयांहून अधिक कर जमा केला आहे. मात्र या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असल्याने उर्वरित थकबाकीदारांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७५५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. या कालावधीत २ लाख १४ हजार ९०० मालमत्ताधारकांनी कर भरला असून त्यापैकी सुमारे ६१.५ टक्के नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे, तर ३८.५ टक्के नागरिकांनी ऑफलाइन माध्यमातून कर भरला आहे. डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल असल्याचे यावरून स्पष्ट होते.
अभय योजनेअंतर्गत १५ हजार ९२ थकबाकीदारांनी एकरकमी थकीत कर भरून ८१ कोटी ३४ लाख ४९ हजार ६८९ रुपयांची भरपाई केली आहे. या योजनेत निवासी, अनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता करासाठी विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत दिली जात आहे. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी संपूर्ण थकबाकी एकरकमी भरणे बंधनकारक आहे.
आर्थिक वर्ष समाप्तीस अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मालमत्ता कर वसुलीला अधिक गती देण्यात आली आहे. नागरिकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. शनिवार (२८ मार्च), रविवार (२९ मार्च) आणि सोमवार (३० मार्च) या दिवशी कर संकलन केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच अंतिम दिवशी म्हणजे ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत ही केंद्रे कार्यरत राहतील.
याशिवाय ऑनलाइन पेमेंट, विविध डिजिटल माध्यमे तसेच व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या सुविधेद्वारे नागरिकांना कर भरणे अधिक सुलभ करण्यात आले आहे. कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे, व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा वापर करणे किंवा प्रत्यक्ष कर संकलन केंद्रात जाऊन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसएमएस, नोटीस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे थकबाकीदारांशी सातत्याने संपर्क साधला आहे. त्यामुळे वसुली प्रक्रियेत लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक असल्याने उर्वरित मालमत्ताधारकांनी ही संधी न दवडता त्वरित थकीत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा करण्यात आले आहे.
