औषधनिर्मितीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आवश्यक; ‘पल्स’ परिषदेत तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. २७ : औषधनिर्मिती प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करणे अत्यावश्यक असल्याचे मत देश-विदेशातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. बीकेसी येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पल्स’ परिषदेत ‘नेक्स्ट जनरेशन फार्मा अँड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावरील चर्चासत्रात उद्योग, शासन आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी भविष्यकालीन औषधनिर्मितीच्या दिशांवर सखोल विचारमंथन केले.
चर्चासत्राच्या प्रारंभी औषध उद्योगात होत असलेल्या झपाट्याने बदलणाऱ्या तांत्रिक व नियामक प्रक्रियांचा आढावा घेण्यात आला. नियामक सुधारणा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उद्योग-शासन सहकार्य आणि रुग्णकेंद्रित धोरणे या घटकांमुळे भारताला जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात अधिक बळकटी मिळू शकते, असा एकमताने निष्कर्ष नोंदवण्यात आला.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी डॉ. संतोष व्ही. इंद्राक्षा यांनी भारतातील औषध नियमन अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग आणि डेटा-आधारित तपासणी प्रणालीचा वापर वाढविला जात असून त्यामुळे नियामक प्रक्रिया अधिक काटेकोर व प्रभावी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औषध उद्योगातील बाजारपेठेपर्यंत पोहोच (मार्केट अॅक्सेस) याचे महत्त्व अधोरेखित करत नेहा द्विवेदी यांनी संशोधनातून विकसित होणारी नवी औषधे रुग्णांपर्यंत जलद आणि परवडणाऱ्या दरात पोहोचण्यासाठी शासन आणि उद्योग यांच्यात सुसंवाद व सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रभात सिन्हा यांनी भारतातील धोरणात्मक स्थैर्य आणि गुंतवणुकीसाठी तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणाचा उल्लेख करत भारत जागतिक औषधनिर्मिती साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे मत व्यक्त केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारताकडे वाढते आकर्षण ही त्याचीच साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थेवर भर देताना प्रिथा कर बसुमलिक यांनी औषधांची किंमत, विमा सुविधा आणि वितरण यंत्रणा सुधारल्यास रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळू शकतात, असे सांगितले. डिजिटल आरोग्य मंच आणि माहिती विश्लेषणाच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक बनवता येईल, असे त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करत रवी वालिया यांनी भविष्यातील आरोग्य व्यवस्थेत या दोन्ही क्षेत्रांचे एकत्रित योगदान निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले. संशोधन, नवकल्पना आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी वाढविल्यास आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. राजीव छिब्बर यांनी भारतातील औषध आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रासाठी उपलब्ध संधींचा आढावा घेत कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन पद्धतींचा अवलंब केल्यास भारत जागतिक स्तरावर अधिक सक्षम ठरेल, असे स्पष्ट केले.
या चर्चासत्रातून औषधनिर्मिती क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नियामक धोरणे, संशोधनातील गुंतवणूक आणि रुग्णांपर्यंत औषधांची सुलभ उपलब्धता या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. एकूणच, भविष्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी तंत्रज्ञानाधारित आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष या परिषदेतून पुढे आला.
