कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती
नवी मुंबई, दि. २३ : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा आणि कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती अभियानाला गती दिली आहे. दि. १५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध दुर्लक्षित भागांमध्ये व्यापक स्वरूपात स्वच्छता उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावरही भर दिला जात आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, रेल्वे स्थानके, सायन-पनवेल महामार्ग परिसर, झोपडपट्टी भाग, गाव व गावठाण क्षेत्र, तलाव आणि खाडी किनारे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, स्वच्छता लक्ष्य युनिट्स तसेच घरांच्या किंवा इमारतींच्या मागील बाजूस असलेल्या अरुंद गल्ल्या अशा भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची जाणीव वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यासोबतच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घराघरांतून कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्याबाबत विशेष जनजागृती केली जात आहे. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा अशा चार स्वतंत्र प्रकारांत कचरा वर्गीकृत करून तो वेगवेगळा संकलन वाहनांना देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठ विभाग कार्यालयांच्या हद्दीत एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या माध्यमातून सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना, संस्था आणि घरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती केली जात आहे. कचरा वर्गीकरणाचे महत्त्व, पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी नागरिकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले आणि इतर संस्थांनी आपल्या परिसरातच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारावेत, यासाठीही महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे व्यवस्थापन झाल्यास वाहतूक खर्च कमी होण्यासोबतच पर्यावरणीय परिणामही मर्यादित राहतील, असे प्रशासनाचे मत आहे.
विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत परिमंडळ क्रमांक १ मध्ये सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. सानपाडा येथील सेक्टर-५ मधील बाळाराम पाटील सार्वजनिक शौचालय, सीबीडी बेलापूरमधील सुनिल गावस्कर मैदानाजवळील सार्वजनिक शौचालय, आग्रोळी येथील आयटीआय परिसरातील शौचालय तसेच कोपरखैरणे निसर्ग उद्यान आणि सेंट मेरी उद्यान परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अंतर्गत व बाह्य स्वच्छता करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनाही स्वच्छता आणि आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
परिमंडळ क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या कचरा व्यवस्थापन पद्धतींची पाहणी करण्यात आली. ऐरोलीतील गवतेवाडी, माईंड स्पेस, चिंचपाडा तसेच दिघा येथील ग्रीन वर्ल्ड सोसायटीसह विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबंधित व्यवस्थापक आणि प्रकल्प संचालकांना मार्गदर्शन केले. सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प आणि कचरा प्रक्रिया यंत्रणा सातत्याने कार्यरत ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या समन्वयातून सर्व विभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने या मोहिमा राबविण्यात येत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणातील दर्जा उंचावण्याबरोबरच नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नवी मुंबई घडविण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
