सायबरबुलिंग, हिंसा वाढणं, सेक्स्टिंग,ट्रोलिंग, सोशल मिडियाचं व्यसन, नो मोबाईल फोबिया, फेसबुक डिप्रेशन या व अशा अनेक विषयांवर नीलांबरी जोशी यांच्याशी साधता येणार संवाद
“कर लो दुनिया मुठ्ठी में” हे जाहिरातीलं वाक्य हातात मावणा-या मोबाईलमुळे खरं होण्याचा काळ आहे. बातम्यांपासून चित्रपटांपर्यंत आणि फोटोग्राफ्सपासून व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर पर्यंत सगळं काही माणसाच्या मुठीत आहे. आॉनलाईन शिक्षण, वैद्यकीय मदत, एकमेकांचे विचार सहजपणे एकमेकांपर्यंत पोचवता येणं, समविचारी माणसं/संस्था एकत्र येऊ शकणं, सामान्य माणसालाही आपला आवाज समुदायापर्यंत पोचवण्याची संधी मिळणं, सामाजिक पातळीवर एकमेकांना मदत होणं, आपली उत्पादनं आणि सेवा यांच्या मार्केटिंगसाठी उपयोग –असे सोशल मिडियाचे विविध फायदे आहेत.
त्याचबरोबर सायबरबुलिंग, हिंसा वाढणं, सेक्स्टिंग,ट्रोलिंग, सोशल मिडियाचं व्यसन, नो मोबाईल फोबिया, फेसबुक डिप्रेशन, तुलना, ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन, इंटरनेट गेमिंग डिसआॉर्डर, झोपेवर होणारे परिणाम, पालक-मुलं आणि सर्व प्रकारच्या नात्यातले विसंवाद वाढणं असे कित्येक तोटेही आहेत.
याच म्हणजे “सोशल मिडिया : शाप की वरदान?” या विषयावर येत्या शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगांव येथे “केशव गोरे स्मारक ट्रस्ट” आणि “पुन्हा भेट” यांनी ख्यातनाम लेखिका नीलांबरी जोशी यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. नुकतंच त्यांचं ‘माध्यमकल्लोळ’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. माध्यमविश्वाचा सखोल आढावा घेणाऱ्या या पुस्तकात त्यांनी सोशल मीडियाशी संबंधित अनेक विषयांबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
वेळ : संध्याकाळी ५.३० वाजता. स्थळ : मृणाल गोरे दालन, पहिला मजला, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगांव (प), मुंबई.
टीप : हा व्याख्यानाचा कार्यक्रम विनामूल्य आहे याची कृपया नोंद घ्यावी