
शरद बाविस्कर लिखित ‘भुरा’ नेमकं का वाचावं याच कारण लेखिका कविता ननवरे सांगत आहेत; जरूर वाचा
भुरा वाचून झाल्यावर फार मोठ्या समाधानाने पुस्तक मिटवून ठेवलं असलं तरी मागच्या तीन चार वर्षांपासून दिशाहीन तरुण पिढीविषयी मला पडत असणाऱ्या प्रश्नांनी मुसंडी मारत डोकं वर काढलं. मग भुराच्या यशाचं समाधान कापरासारखं उडून गेलं.
विसाव्या वर्षी ज्याचं या जगात कस्पटासमान स्थान होतं तो अतिसामान्य पोरगा वयाच्या ३२व्या वर्षी जवाहरलाल नेहरू नावाच्या आंतराष्ट्रीय विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञानाचा प्राध्यापक होतो. एखाद्या सिनेमात शोभेल असं कथानक. भुराला सगळ्या सोयीसुविधा सहज उपलब्ध झाल्या किंवा तो त्याला उच्चशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी होती किंवा तुम्हांला वाटेल तो सधन घरातील होता. तर भुराला यांपैकी कशाचंच प्रिव्हिलेज नव्हतं. मग तुम्ही म्हणाल त्याचं नशीब जोरात असेल. तर नाशीबासारख्या थोतांडावर विश्वास ठेवून जगणाऱ्यापैकी तो अजिबात नव्हता.
भुरा बुद्धिमान होता हे सत्य. पण जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमान असून भागत नाही तर त्या बुद्धीला सतत धार देत राहिलं पाहिजे. बुद्धीला गंज न चढू देण्याविषयी सतर्क असलं पाहिजे. फक्त बुद्धी असून भागलं असतं तर आपण सगळेच भुरासारखे यशस्वी झालो असतो. कोणाचंही नीट मार्गदर्शन नसताना बारा बारा पंधरा पंधरा तास अभ्यास करून भुराने त्याला जे हवं ते खेचून आणलं. पदवीनंतर घरातून निघतानाच थोडीफार आर्थिक मदत घेतली होती तेवढीच बाकी सगळं शिक्षण, मोठ्या पदव्या भुराने शिकता शिकता पैसे कमवत मिळवल्या. ना कुणाकडे रुपयांची भीक मागितली ना मदतीसाठी हात पसरला. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे? या प्रश्नाचं ठोस उत्तर त्याच्याकडे होतं आणि भुरा त्याचाच पाठलाग करत राहिला.
खरं तर मला भुराची स्टोरी सांगायची नाही किंवा पुस्तकाचं परीक्षण वगैरे तर अजिबातच करायचं नाही. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मला वेगळीच चिंता भेडसावतेय त्याविषयी मला लिहायचं आहे.
मी खेडेगावात जन्मले. वाढले. माझी घडण तिथल्याच भौतिक, सामाजिक वातावरणात झालेली आहे. मला शहरापेक्षा ग्रामीण भागाविषयी, तिथल्या लोकांविषयी काकणभर अधिक आस्था आहे. आता जी पिढी विशी पंचविशीत आहे ती काय करतेय हे मी सतत उत्सुकतेनं बघत असते. मागच्या चार पाच वर्षांपासून फार कमी वेळा गावी जाणं होतं. गावी गेल्यावर मला सगळ्यात जास्त उत्सुकता असते की गावातल्या मुलांचं काय चाललंय ते जाणून घेण्यात. कोण काय शिकतंय? कुणाचं कुठे सिलेक्शन झालं आहे का? कुणी नवा बिजनेस टाकला का? वगैरे वगैरे.
मागच्या पाच वर्षांत माझ्या या प्रश्नांना प्रत्येकवेळी निगेटिव्ह उत्तरं मिळाली आहेत. शिक्षणाविषयी फार अनास्था ग्रामीण भागात वाढली आहे. फार मोजकी मुलं शिकतात. त्यांचे पालक त्यांना शिकवत आहेत. ते पण डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग यापलीकडे काही नाही. किंबहुना यापलीकडेपण चांगलं शिक्षण आहे हे कुणाच्या गावी नाही. आम्हाला कोण मार्गदर्शन करणारं नाही असा दोष देण्यात काही राम नाही, कारण आता सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत. हवं ते मार्गदर्शन, हव्या त्या कोर्सची माहिती घरबसल्या मिळू शकतेय. पण फुकटात मिळालेला स्मार्टफोन गेम खेळण्यासाठी आणि चॅटिंग करण्यासाठी, पॉर्न बघण्यासाठी जास्त वापरला जातोय.
दहावी बारावी झाली की ड्राइविंग शिकून एखादं वाहन घेऊन भाडं करा, कारखान्यात कामाला जा, नाहीतर आहेच गावाशेजारची MIDC. यातलं काहीच करायचं नसेल तर चौकात पानटपरी टाकायची, आपल्यासारखीच चांडाळ चौकडी गोळा करून गुटख्याच्या पुड्या विकत बसायचं. हवा करायला अधूनमधून असतातच की शिव-भीम जयंत्या, गणेशोत्सव आणि गावच्या जत्रा. यांच्या अंगावरचे कपडे, हातातल्या दोर्यांच्या लडी, मनगटातली कडी बघितली तरी त्यांच्या भविष्याबद्दल कळून चुकतं. शंभरातला एखादाच शिकतोय शहण्यासारखा. आपल्या आयुष्या आणि भविष्याची नीट घडी बसवायची काळजी त्याला.
यावेळी दिवाळीत गावाकडे गेले तर मागच्या सहा महिन्यात तीन लव्ह मॅटर झाल्याचं कळलं. दोन लव्ह बर्डसनी आत्महत्या केल्या. तिसर्यातल्या एकाने केली. एका प्रकरणातली मुलगी बारावीला पहिली आली होती. ८०+मार्क्स होते. एका मुलाच्या प्रेमात पडली. हा समाज आमचं प्रेम मान्य करणार नाही वगैरे चिट्ठी लिहून एकाच दोरीला दोघांनी फाशी घेतली. हे ऐकून माझा मेंदू विचार करायचाच बंद झाला.
गावातली लोकं म्हणतात की, या मोबाईलनं दुनिया वाटोळी केली! या वाक्यावर नाही म्हणलं तरी थबकायला होतं. आमच्या हाती मोबाईल आला आमचं शिक्षण संपताना. आताच्या पोरांच्या हातात स्वतःचा मोबाईल येतो वयाच्या सोळाव्या वर्षाच्या आत. हे मी गावातलं निरीक्षण सांगतेय. शहरात त्याआधीच मुलांच्या हाती मोबाईल येतो. आम्ही शाळेत असताना कॉलेजात असताना कुणाबद्दल आकर्षण वाटलं की लगे स्वतःला तिथेच थांबवून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचो. फार फार तर एखाद्या मैत्रिणीला हळूच सांगायचो. यापलीकडे काही नाही. आता मुलांना मोबाईलवर प्रेम-अफेअर-लफडी हेच पाहायला मिळतं. आपण पण करून बघूयाच्या नादात पार आयुष्याचा चोथा करून बसतात. कुठे काही विपरीत घडलं की समाज पालकांच्या नावाने बोटं मोडतो. शिक्षित पालक आणि त्यांची मुले यांच्यात जरातरी संवाद असतो पण अडाणी पालक आणि त्यांच्या मुलांमध्ये संवाद ना के बराबर. आपली मुलं काय करतात? कुठे जातात? त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? याचा काही अतापता नसतो. किंबहुना ती त्यांची प्राथमिकता असत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी राबताना या गोष्टी दुय्यम बनून राहतात त्यांच्यासाठी.
या अशा गोष्टींमुळे होतंय काय की ज्यांना खरंच शिकायची चाड आहे. आयुष्यात काहीतरी करायचं आहे त्यांना अटकाव केला जातो. माझ्या शेजारची मुलगी आहे जिला शिकायचं आहे. नोकरी करायची आहे. पण गावात अशी वाईट प्रकरणं घडत असल्याने तिची आई म्हणाली ,” नकू बाई पुढं शिकवायला. गावात नकू तसलं घडतंय. आपलं लेकरू आपल्या घरात बरं. द्यायचं पुढच्या वर्षी लगीन लावून.” आता त्या मुलीला स्थळ बघायला सुरू आहे. तिच्या आईला कितीही समजावून सांगितलं तरी उपयोग नाहीय. बारावीत पहिली आलेली मुलगी एका विवाहित पुरुषाच्या नादी (होय मी नादी लागणच म्हणेन) लागून त्याच्यासोबत फाशी घेऊन मेली. तिने तिच्या वयाच्या कितीतरी मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खडतर करून टाकला. खेडेगावात घडणाऱ्या अशा प्रकरणांचे फार मोठे दूरगामी परिणाम होतात.
प्रेम करा. प्रेम जगा. पण शिक्षणाची करियरची वाट न सोडता. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा. कर्तृत्व सिद्ध करा. तुम्ही ज्याच्या म्हणतील त्याच्याशी/तिच्याशी लग्न लावून द्यायला आईवडील फार कचरणार नाहीत. आईवडिलांचा विश्वास संपादन करणं फार महत्वाचं असतं. तो आधी करा. आपली मुलं चांगली शिकत असली की आईबापसुद्धा कर्ज काढुन मुलांना शिकवतात. मी ज्या भुराच्या निमित्ताने हा विषय मांडतेय तो भुरा आजूबाजूला कुठलंच सकारात्मक वातावरण नसताना शिकला. खूप मोठा झाला. जगातल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये जाऊन शिकला. तेही एकाचढ एक शिष्यवृत्ती मिळवत.
प्रत्येक विद्यार्थ्याने भुरा हे आत्मकथन वाचलं पाहिजे. भुराने स्वतःचं आयुष्य बदलवलं. भुरा वाचून यापुढे हजारो मुलांची-मुलींची आयुष्य बदलतील यात शंका वाटत नाही. आपण कुठले आदर्श ठेवले पाहिजेत याविषयी जागरूक असलं पाहिजे. केक कापायला हातात तलवारी घेणं, तोंडात सदैव माव्याचा तोब्रा भरलेला असणं, मोबाईलवर नको त्या गोष्टी बघत दिवसाच्या दिवस घालवणं लय सोपं आहे मुलांसाठी. रोज नवे नवे ड्रेस घालून, ढीगभर मेकअप करून वेगवेगळ्या अँगलने शेल्फया काढणं, टिव्ही मालिका बघून त्यातल्या आदर्श बहू होण्याचं स्वप्नं बघून आयुष्याची माती करून घेणं हे कालही होतं आजही आहे. पण आता काळ मोठा कठीण आलाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल.
आजच्या बकाल काळात तरुण मुलांना भरकटण्यापासून वाचवण्यात भुरा light house सारखं काम करेल. शरद बाविस्कर यांनी आपलं आत्मकथन लिहून येणाऱ्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. म्हणून मला भुरा फार महत्वाचं वाटतं.
भुरा वाचा. तरुण मुलामुलींना भेट द्या. वाचायला भाग पाडा. प्रत्येक शाळेपर्यंत हे पुस्तक पोहोचायला हवंय. भुराची ही गोष्ट या रोगग्रस्त पिढीसाठी जालीम औषध ठरेल.
भुरा हे पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क
लोकवाङ्ममय गृह प्रकाशन, मुंबई
+918454049036
– कविता ननवरे