सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा
मुंबई, दि. ३ : सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू आणि गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतींवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात वैज्ञानिक सहकार्याची नवी दिशा निश्चित होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च यांच्यात सार्वजनिक आरोग्य, सर्पदंश उपचार, वनस्पतीजन्य औषध संशोधन आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धी या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जागतिक स्तरावर विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण भागांमध्ये सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत असून, त्यावरील प्रभावी, सुरक्षित आणि परवडणाऱ्या उपचारपद्धती विकसित करण्यासाठी संयुक्त संशोधनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत संस्थेचे अजित जगताप आणि मृणाल घाग सावंत सहभागी झाले होते. घानाकडून सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्चचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांनी सहभाग नोंदविला.
बैठकीत सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या घटनांवर सखोल चर्चा करण्यात आली. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक सर्पदंशाला बळी पडत असल्याने वनस्पतीजन्य औषधांच्या साहाय्याने नव्या उपचारपद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स विकसित करणे, संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, आंतरराष्ट्रीय संशोधन निधीसाठी प्रस्ताव तयार करणे आणि संशोधन क्षेत्रातील कौशल्यवृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
यावेळी बोलताना डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले की, जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा भागीदारीमुळे नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळेल, वैज्ञानिक क्षमता अधिक बळकट होईल आणि जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक उपचारपद्धती विकसित करण्यास मदत होईल.
प्रस्तावित सहकार्याअंतर्गत संशोधक, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त संशोधन अभ्यास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि ज्ञानविनिमय यांसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे युवा संशोधकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या बैठकीमुळे भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया मजबूत झाला असून भारत आणि घाना यांच्यातील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य, विषशास्त्र, जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन आणि ट्रान्सलेशनल सायन्स या समान प्राधान्य क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था एकत्रितपणे कार्य करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
सर्पदंश व्यवस्थापन, नाविन्यपूर्ण औषधनिर्मिती आणि जागतिक आरोग्य संशोधन क्षेत्रात भारत-आफ्रिका सहकार्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात असून, या उपक्रमातून भविष्यात अनेक प्रभावी आरोग्यविषयक संशोधन प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
