Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“ज्यांना जगण्याचं कारण सापडलेलं असतं, ते कसं (जगायचं) या प्रश्नाचं उत्तर “कसंही” शोधतातच..!”

एका रिमझिम गावी, भरुन आहे, हृदयस्थ तान

“रात्री ८ ते ९ च्या दरम्यान करायला मी एक जंगी प्लॅन आखलाय.. त्या दरम्यान मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये जायचा विचार करतोय..” किंवा “सकाळी कामावर जायचं आहे आणि उठायला उशीर झाला आणि ताप आल्याचं लक्षात आलं तर तुम्ही काय म्हणाल? I so late … !” असे जोक्स कोरोनाकाळात सर्रास ऐकू येतायत. यातून मनातल्या नकारात्मक विचारांवर किंचितशी हास्याची फुंकर पडते. पण रोजच्या बातम्या, स्टॅटिस्टिकल डेटा, लस सापडल्याच्या अनंत (खर््यारखोट्या) बातम्या, कोरोनानंतरच्या भवितव्याचा निरनिराळ्या क्षेत्रातल्या विचारवंतांनी घेतलेला वेध, शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं सांभाळावं याच्या सूचना यातून आपल्या कोणाचीच सुटका होत नाहीये. त्यातून नकारात्मक आणि उद्वेगजनक मूड बर््याकचदा वाढतोच.

मनात असे चित्रविचित्र आणि प्रामुख्यानं नकारात्मक विचार येण्यामागे बरीच कारणं आहेत. या काळानंतर अनेक लोक मृत्युमुखी पडणार आहेत, सगळ्यांची आयुष्यं आणि वागणं कदाचित कायमस्वरुपी बदलणार आहे. उदाहरणार्थ, काहींना कोरोनानंतरच्या काळात भरभरुन आयुष्य जगावं; आधी ज्या गोष्टी करुन पहायच्या राहिल्या होत्या, त्या आता करुन घेऊ असं वाटायला लागेल. काहीजणांना आपण खूप उधळून देऊन आयुष्य जगलो, आता जरा शांतपणे जगू असं वाटेल. काहीजणांच्या आयुष्यात कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर असे काही बदल घडणारही नाहीत.

हे सगळं घडत असताना मनातल्या मनात आजवर जपलेल्या आदर्शांचं, नीतीनियमांचं, व्हॅल्यू सिस्टीमचं परत एकदा मूल्यमापन चालू आहे. इतकंच नव्हे तर अनेकांना मानवाच्या अस्तित्वाबद्दलचेही प्रश्न पडतायत. मृत्यू, एकटेपणा या संकल्पनांचं मनात पुनर्मूल्यांकन चालू आहे. सगळ्यांना एक बधिर अवस्था आणि अर्थहीनपणा (कशालाच अर्थ नाही असं वाटणं) जाणवणं वाढत चाललंय.

आपण मान्य करु वा ना करु, पण मृत्यूची भीती प्रत्येकाला असते. “जरा, मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत” हे गदिमांचे शब्द आपल्याला पाठ असतात. पण ते पचनी पडत नाहीत. त्यामुळे जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू येणार हे माहिती असूनही आपण तो विचार कायम टाळतो. कोरोनाचा सर्वात मोठा जाणवणारा मानसिक परिणाम हा चिंताग्रस्तता हा आहे. मृत्यू येईल याची भीती आणि उद्याची चिंता यानं जवळपास प्रत्येकाला ग्रासलं आहे. जाणिवेत ते नसलं तरी सबकॉन्शस माईंडमध्ये ते आहेच.

कोरोनामुळे अजून एक महत्वाची गोष्ट घडलीय. ती म्हणजे, बहुतेकजण एकटे किंवा मर्यादित लोकांच्या सहवासात अडकले आहेत. त्यातून मनातला एकाकीपणा वाढला. “कोई साथी है तो मेरा साया” हे सत्य मान्य करणं मुळातच अनेकांना अवघड असतं. कोरोनाच्या काळात तर कोरोनाग्रस्तानं एकटं रहायचं, एकटं हॉस्पिटलमध्ये मरायचं याचीही भीती हजारोपटीनं वाढली आहे.

अशाच नकारात्मकतेतून “आपल्या आयुष्याला काय अर्थ आहे” असं वाटणं हा प्रकारही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढला. काम करणं बंद झालं, कित्येक बेरोजगार झाले. व्यवसाय बंद पडायला लागले आहेत, बॅंकेतली पुंजी संपायला लागली आहे अशा स्थितीत आनंदी रहायला एकही कारण सापडणार नाही आणि अर्थहीन वाटण्याचं प्रमाण वाढेल असा भल्याभल्यांचा अंदाज आहेच.

अशावेळी हमखास व्हिक्टर फ्रॅंकेलचं “मॅन्स सर्च फॉर मिनिंग” आठवतंच. दुसर््या महायुध्दात होलोकॉस्टमध्ये अडकलेल्य लोकांना धीर देऊन माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारी थेरपी या मानसोपचारतज्ञानं सुरु केली. कोरोनाकाळात आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

फ्रॅंकेल म्हणतो, “आपण कोणत्याही परिस्थितीत कोणता पर्याय निवडतो ते आपल्या हातात असतं. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा स्वत:ला बदलणं हाच एकमेव पर्याय आपल्या हातात असतो.” पण त्याचं दुसरं एक वाक्यही तितकंच महत्वाचं आहे.. “ज्यांना जगण्याचं कारण सापडलेलं असतं, ते कसं (जगायचं) या प्रश्नाचं उत्तर “कसंही” शोधतातच..!” आरती प्रभुंच्या शब्दात सांगायचं तर “एका रिमझिम गावी, भरुन आहे हृदयस्थ तान..पण स्वगत विसरुन तिथे जाता आलं पाहिजे.. !”

  • नीलांबरी जोशी (लेखिका – कॉर्पोरेट कल्लोळ)

 

 

 

References :

https://www.psychologytoday.com/us/blog/the-second-noble-truth/202004/the-existential-crisis-you-are-or-should-be-having

https://www.psychologytoday.com/us/blog/the-second-noble-truth/202004/what-is-your-covid-19-story

Existential Psychotherapy Book by Irvin Yalom

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *