आंतर जिल्हा प्रवासासाठी बनावट पास बनवून देणाऱ्यांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाई
नालासोपारा: पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात ई -पासचा घोटाळा करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा अशी अटक झालेल्यांची नावं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे ई-पासची विक्री करत होते.
ई -पास मिळवून देण्यासाठी ते लोकांकडून १५०० रुपये घेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कोकणात जाण्यासाठी मुंबईतून बनावट पास तयार करून देणाऱ्या एका टोळीवर मुंबई गुन्हे शाखा आणि सिंधुदुर्ग पोलिस यांनी एकत्रितपणे कारवाई केली आहे.
या प्रकरणी सर्फराज हसन शेख याला मालवण पोलिसांनी अटक केली असून अब्दुल करीम मोहम्मद शेख, समीर समशुद्दीन शेख आणि नूर मोहम्मद शेख या तिघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे.
या टोळीत सहभागी आणखी काही आरोपींची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. या चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source – AIR