राज्यसेवा (मुख्य) परीक्षा–२०२४ चा अंतिम निकाल जाहीर; ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा–२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, तो आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेद्वारे राज्यातील विविध प्रशासकीय सेवांसाठी एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
ही मुख्य परीक्षा २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत पार पडली होती. लेखी परीक्षा आणि त्यानंतरच्या मुलाखत प्रक्रियेच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. निकालासोबतच प्रवर्गनिहाय सीमांकन गुण आणि सविस्तर माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यंदाच्या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच आरती परमेश्वर जाधव यांनी महिला खुल्या प्रवर्गातून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांची शिफारस संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध जिल्ह्यांमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
