वर्षाअखेरीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाचे लक्ष्य
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या भरती प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि कालबद्धता देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित परीक्षा पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आला असून, पूर्व परीक्षांचे निकाल केवळ २१ दिवसांत जाहीर करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाने व्यापक सुधारणा राबविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आयोगाच्या नव्या धोरणाची माहिती दिली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर तसेच परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर–देशमुख उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष भीमनवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत पूर्व परीक्षा, निकाल आणि पुढील निवड प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मानसिक ताण आणि अनिश्चिततेला सामोरे जावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने भरती प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध करण्यात आला असून, आगामी काळात सर्व पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठीही आयोगाने स्पष्ट आराखडा तयार केला आहे. ज्या पदांसाठी मुलाखतीची आवश्यकता आहे, त्या पदांची संपूर्ण निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर केवळ लेखी परीक्षेच्या आधारे भरती होणाऱ्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांच्या करिअरबाबतची अनिश्चितताही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास अध्यक्ष भीमनवार यांनी व्यक्त केला.
पूर्व परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी स्पष्ट केले की, हा बदल केवळ पूर्व परीक्षांपुरता मर्यादित असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गाच्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा यापूर्वीप्रमाणेच पारंपरिक लेखी पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.
संगणकाधारित परीक्षा आणि गुणांचे समायोजन ही पद्धत नवी नसून आयोगाला या क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा संगणकाधारित प्रणालीद्वारे यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ही प्रणाली वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासार्ह असून न्यायालयानेही तिला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या गुणवत्तेचे अधिक अचूक मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील इतर प्रमुख भरती संस्थांचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. कर्मचारी निवड आयोग दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेत असून रेल्वे भरती मंडळानेही सुमारे १ कोटी उमेदवारांच्या परीक्षा याच प्रणालीद्वारे यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अलीकडेच १६ लाख ३० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांसाठीही हीच परीक्षा प्रणाली वापरली जात असल्याने ती देशभरात व्यापकपणे स्वीकारली गेली असल्याचे अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आयोग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, या सुधारणांमुळे भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्तीची संधी उपलब्ध होऊन स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

