प्रश्नपत्रिकेची गोपनीयता धोक्यात आल्याच्या संशयामुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मुंबई, दि. २७ : राज्यातील लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) – २०२६ अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेबाबत गंभीर संशय निर्माण झाल्याने तसेच परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहावी या उद्देशाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय, तांत्रिक आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रश्नपत्रिकेची सुरक्षित वाहतूक, परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण तसेच गोपनीयतेच्या नियमांचे काटेकोर पालन यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती.
मात्र, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी परिसरात काही व्यक्तींना टीईटी परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या माहितीची गंभीर दखल घेत भिवंडी पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकून तपास सुरू केला.
तपासादरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तींकडून जप्त करण्यात आलेल्या काही प्रश्नांची पडताळणी करण्यात आली असता, त्यातील काही प्रश्न टीईटी जून २०२६ च्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी मिळतेजुळते असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या घटनेनंतर भिवंडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकाराची गंभीरता लक्षात घेऊन परीक्षा प्रक्रियेवरील उमेदवारांचा विश्वास अबाधित राहावा, कोणत्याही प्रकारचा संशय राहू नये तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून नियोजित दि. २८ जून २०२६ रोजीची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीनेच घेण्यात येईल. चौकशीचा अहवाल आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख निश्चित केली जाईल.
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही परिषदेकडून करण्यात आले आहे. परीक्षेची नवीन तारीख, प्रवेशपत्रे, वेळापत्रक तसेच इतर आवश्यक सूचना योग्य वेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका राज्य परीक्षा परिषदेकडून पुन्हा अधोरेखित करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

