पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना केले आवाहन
नवी मुंबई/मोरबे, दि. ९ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जलसाठा, धरण परिसराची सुरक्षा आणि भविष्यातील पाणीपुरवठा नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. हवामान खात्याने यंदा ‘एल-निनो’ परिणामामुळे मान्सून उशिरा सुरू होण्याची तसेच सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान सरासरीच्या सुमारे ९२ ते ९४ टक्के राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत पावसास उशीर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी धरण परिसराला भेट दिली.
या पाहणीवेळी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे, कार्यकारी अभियंता संतोष उनवणे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोरबे धरणात पुढील सुमारे ८५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले. परिस्थितीनुसार भविष्यात पाणीपुरवठा नियोजनाबाबत आवश्यक निर्णय घेण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी धरण परिसराच्या दोन्ही बाजूंनी विस्तृत क्षेत्रभेट घेतली. एका बाजूने आंबेवाडीपर्यंत सुमारे ७.५ किलोमीटर तर दुसऱ्या बाजूने पिरकटवाडी आणि उंबरणेवाडीपर्यंत सुमारे ११ किलोमीटर परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी धरण क्षेत्रालगत काही ठिकाणी खाजगी बांधकामे आढळून आल्याने संबंधित भागांची हद्द तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमिनीची मोजणी आणि सीमांकन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आवश्यक त्या ठिकाणी कुंपण उभारण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. धरण परिसरातील जमीन संरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील अतिक्रमण टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने धरण परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्याचे तसेच सभोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. धरणाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या पिरकटवाडी आणि अन्य तीन वाड्यांमधील पुनर्वसनास पूर्वी नकार दिलेल्या कुटुंबांच्या स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या कुटुंबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
मोरबे धरण हे नवी मुंबई शहरासाठी महत्त्वाचे जलस्रोत केंद्र असल्याने जलसाठ्याचे संवर्धन, धरण परिसराची सुरक्षा आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन यावर महापालिका प्रशासन विशेष भर देत असल्याचे या पाहणीद्वारे स्पष्ट झाले आहे.
