८ मेपर्यंत ७ लाख ७४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, दि. ९ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वेग आला असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने नियमित ‘कॅप फेरी-१’ चे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, दि. ८ मे २०२६ पर्यंत तब्बल ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे.
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत प्रवेश संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. यंदाही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना सुलभ आणि पारदर्शक प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, प्रवेश प्रक्रियेत यंदा तीन नियमित ‘कॅप’ फेऱ्या, त्यानंतर ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
‘शून्य फेरी’ अंतर्गत दि. ८ मे ते २० मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. याच कालावधीत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे, विद्यार्थ्यांकडून हरकती व दुरुस्ती मागविणे, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच विविध आरक्षण आणि कोटा जागांबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
नियमित ‘कॅप फेरी-१’ अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-२ भरण्याची प्रक्रिया दि. २१ आणि २२ मे रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीनुसार महाविद्यालय निवडता येणार आहे.
दि. २३ ते २६ मे दरम्यान ‘कॅप फेरी-१’ ची अलॉटमेंट प्रक्रिया पार पडणार असून २६ मे रोजी पहिली प्रवेश वाटप यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेश निश्चित झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती पाहता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही प्रवेशाबाबत माहिती पाठविण्यात येणार आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २६ ते २८ मे या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर दि. २९ मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, तर दि. ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अडचणी किंवा तांत्रिक मदतीसाठी विद्यार्थ्यांना ई-मेल तसेच हेल्पलाईन क्रमांकाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, दहावीच्या निकालानंतर राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मोठी उत्सुकता असून यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
