१ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मीरा-भाईंदर, दि. ३ : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रिक्षा परवाने व बॅच वितरण प्रक्रियेतील अनियमिततेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सर्व परवान्यांची सखोल पुनर्तपासणी करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या तपासणीचा अहवाल १ मे २०२६ पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निर्णय
आमदार नरेंद्र मेहता यांनी मांडलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस राजेश नार्वेकर, भरत कळसकर, चेतन निकम यांच्यासह विविध प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बोगस कागदपत्रांबाबत चौकशी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः, काही परदेशी नागरिकांनी बनावट रहिवासी दाखले सादर करून रिक्षा व टॅक्सी परवाने मिळवल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष मोहीम आणि कॅम्पचे आयोजन
मीरा-भाईंदर परिसरात रिक्षा परवान्यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे एक महिन्याचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक परवान्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
राज्यभरात तपासणीची शक्यता
मीरा-भाईंदर येथे सुरू होणाऱ्या या तपासणी मोहिमेनंतर राज्यातील इतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही मागील काही वर्षांत वितरित झालेल्या परवान्यांची तपासणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिक्षा परवाना वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अनियमितता रोखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित प्रकरणातील निष्कर्ष अहवालानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत आहेत.
