मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश
नाशिक, दि. २१ : लोकशाही प्रक्रियेचा पाया असलेल्या मतदारयादीची अचूकता आणि अद्ययावतपणा अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
स्वयंजुळवणी आणि तपासणीला गती द्या
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी निर्देश देताना सांगितले की, सन २००२ मधील मतदारयादीतील नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावांची जुळवणी करण्याचे काम वेगाने पूर्ण करावे. यासाठी क्षेत्रस्तरावर काटेकोर पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
घरोघरी भेट देऊन माहिती संकलन
मतदारयादीतील त्रुटी दूर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची अचूक माहिती गोळा करावी. विशेषतः अस्पष्ट छायाचित्रे, अपूर्ण किंवा निरर्थक नोंदी यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांची सुस्पष्ट आणि रंगीत छायाचित्रे संकलित करून ती संबंधित अनुप्रयोगावर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले.
अर्जांवर तात्काळ कार्यवाही आवश्यक
मतदार नोंदणीसंदर्भातील अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठ यावर तत्काळ कार्यवाही करावी. कोणताही अर्ज १५ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी किंवा संपर्कास तत्काळ प्रतिसाद देण्याचेही निर्देश देण्यात आले.
जनजागृतीवर भर
मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगत, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा देताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून एकूण ५१ लाख ५६ हजार मतदार आहेत. सन २००२ मधील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या यादीशी विद्यमान मतदारांची जुळवणी करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत १५ लाख १६ हजार मतदारांची जुळवणी पूर्ण झाली आहे. या कामाचा नियमित आढावा घेऊन उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
