दिंडोरी येथे आयोजित ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती
नाशिक, दि. १९ : नाशिक शहराला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसराचा आदर्श ग्रीन कॅम्पस म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. विद्यापीठ परिसर अधिक हरित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन, संगोपन आणि दीर्घकालीन संरक्षण यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र, मौजे शिवनई, ता. दिंडोरी येथे आयोजित ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गिते, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, बागेश्री मांडाळकर, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी स्थायी समिती सदस्य गणेश गिते, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह प्राध्यापक, विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानांतर्गत विद्यापीठाच्या सुमारे बासष्ट एकर परिसरात अंदाजे दीड हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात असले तरी यंदा वृक्षसंवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे. अभियानाअंतर्गत आठ ते दहा फूट उंचीची वृक्षरोपे नियोजनबद्ध पद्धतीने लावण्यात आली असून प्रत्येक वृक्षासाठी संरक्षक व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा, देखभाल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. लावलेली झाडे शंभर टक्के जिवंत राहावीत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन करणे हीच पर्यावरण संवर्धनाची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिक महानगरपालिकेने शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आपले विशेष भावनिक नाते असल्याचे सांगताना मंत्री महाजन म्हणाले की, विद्यार्थी म्हणून या विद्यापीठात शिक्षण घेत असताना कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉलसह विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याची संधी मिळाली. विद्यापीठातील शिक्षण, संस्कार आणि वातावरणामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळाली. त्यामुळे हा परिसर अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होतो, असे सांगून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने या वृक्षारोपण मोहिमेचे केलेले नियोजन कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
जलसंवर्धनाच्या दृष्टीने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना मंत्री महाजन म्हणाले की, पाणी अडविणे, बंधाऱ्यांमधील गळती रोखणे, जलसाठ्यांचे संरक्षण करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन बंधारे आणि धरणांची उभारणी करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करीत आहे.
विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या विकासासाठी शासनाकडून कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी सांगितले की, एनएमआरडीएने मंजूर केलेल्या अठरा मीटर रुंद रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल.
‘उन्नत नाशिक’ अभियान यशस्वी करण्यासाठी सुदृढ, सक्षम आणि जबाबदार युवा पिढी घडणे आवश्यक असल्याचे सांगून मंत्री महाजन यांनी तरुणांना सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. निरोगी जीवनशैली स्वीकारून सक्षम समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.

दऱ्याई माता देवस्थान परिसरातही वृक्षारोपण
नाशिक महानगरपालिकेच्या ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन ग्रीन नाशिक’ उपक्रमाअंतर्गत दऱ्याई माता देवस्थान परिसरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार, विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिता पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षदिंडीला प्रारंभ करण्यात आला. या वृक्षदिंडीत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे जलद प्रतिसाद पथक, जनार्दन स्वामी वारकरी शिक्षण संस्था (त्र्यंबकेश्वर), श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था (त्र्यंबकेश्वर) तसेच सूर्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मंत्री महाजन म्हणाले, “नाशिक शहरात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी दर रविवारी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ उभारण्यात येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या नाशिक शहराची ओळख सर्वात हिरवेगार शहर म्हणून झाली पाहिजे यादृष्टीने सर्वकष प्रयत्न करूया.”
नाशिक शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने शासन, प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणारी ही व्यापक वृक्षसंवर्धन मोहीम भविष्यात पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
