Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंडखोर ब्लॉग: कोरोना लॉकडाऊन संदर्भातला ‘हा’ लेख ‘वाचाल तर नक्की वाचाल’

प्रदीर्घ लॉकडाऊन आणि कोरोना

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वूहानमध्ये सुरू झालेल्या COVID-19 या करोना विषाणुजन्य आजाराने झपाट्याने विश्‍वव्यापी समस्या निर्माण केली. हा एक अगदीच नवीन विषाणूजन्य आजार होता.

● मानवजातीचा यापूर्वी या आजाराशी – या विषाणूशी संपर्क न आल्याने याविरुद्ध मानवजातीत साधारणतः काही आजारांविरुद्ध (उदा इन्फ्लुएन्झा) काही प्रमाणात पूर्वी संपर्क आल्यामुळे असते तशी कोणतीही विशिष्ट रोगप्रतिकारशक्ती या आजाराविरुद्ध मानवजातीत नव्हती.
● बहुतांश विषाणूजन्य आजारांप्रमाणे या आजारालाही खात्रीपूर्वक बरे करणारे औषध नव्हते – अजूनही नाही.
● हा अगदीच नवीन आजार असल्यामुळे याविरुद्ध अर्थातच लस (vaccine) तयार नव्हती – आणि सार्वत्रिक वापरासाठी लस उपलब्ध होण्यास कमीतकमी दीड-दोन वर्षे जावी लागतील असा पूर्वानुभव होता.
● हा आजार आजारी माणसाच्या श्‍वासातून, शिंकल्या – खोकल्यातून निरोगी माणसाकडे पसरत होता. काही लक्षणरहित व्यक्तीही हा आजार पसरवू शकतात असे मानण्यास वाव होता.
● या आजारात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात माणसे आजारी पडत होती – त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागत होते – त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये बेड्स कमी आणि रुग्ण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही रुग्णांना बेड न मिळाल्यामुळे – उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. – आणि बरीच माणसे मृत्युमुखी पडत होती.

या सर्व गोष्टींचा विचार करता ह्या आजाराचा मोठ्या प्रमाणात एकाचवेळी होणारा प्रसार टळावा म्हणून सर्वप्रथम चीनने वूहानमध्ये आणि मग हुबेई प्रांतावर लोकांच्या हालचालींवर निर्बंध घातले. कम्युनिस्ट राजवटीमुळे लोकांना हे लवकर अंगवळणी पडले. त्यानंतर इटली, स्पेन, फ्रान्स मग जवळजवळ पूर्ण यूरोप – भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड होता होता जगातील एक तृतीयांश लोकसंख्या लॉक डाऊन झाली. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉक डाऊन आणि क्‍वारंटाईन. एकमेकांपासून दुर रहा, घराबाहेर जाऊ नका आणि गाव, जिल्हा, शहर, राज्य, देश सगळयांच्या सीमा सील बंद करा, सार्वजनिक वाहतुक – रेल्वे, बस, विमाने – सारे सारे बंद करा – हे धोरण कमी अधिक प्रमाणात ब-याच देशांनी अवलंबले.

या लॉकडाऊनमागचा दोन उद्देश होते

१. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे आपण कदाचित या विषाणूचा प्रसार लांबवू शकतो – जेणेकरून एकाचवेळी अत्यधिक लोकांना याची बाधा होऊन आपल्या आरोग्य सेवांवर अतिरिक्त ताण येऊन त्या कोलमडू नयेत . आणि

२. या “लांबवलेल्या” काळात कदाचित आपल्याला या विषाणूवर परिणामकारक लस किंवा औषध मिळाले तर भविष्यात आपण या विषाणूवर आपण देवी किंवा पोलिओवर मात केली त्याप्रमाणे मात करु शकू.

कोरोना विषाणू हा श्वासाद्वारे – खोकल्या – शिंकल्यातून – हवेद्वारे पसरतो. आणि कितीही कठोरपणे आपण ‘लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईनची’ ची अंमलबजावणी केली तरी आपण आताच्या काळात आपण अधिकाधिक परस्परावलंबी असल्यामुळे या विषाणूचे संक्रमण आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे – हे लॉकडाऊन करणा-यांना माहित होते. आज जागतिक अर्थव्यवस्था ही कधी नव्हे इतकी जास्त परस्परावलंबी झाली आहे. शिकार आणि कंदमुळे शोधून, खाऊन त्यावर उदरनिर्वाह करणा-या अश्मयुगातील मानवापासून पुढे जाऊन, स्वयंपूर्ण खेडयांपासून – तेथूनही पुढे जाऊन – ते आता आपण इतके पुढे आलो आहोत, इतके एकमेकांत गुंतलो आहोत की आपल्या सर्व गरजांकरिता आपण अधिक-अधिक दुस-या गाव, शहर, देशांतील मानवांवर अवलंबून राहू लागलो आहोत. त्यामुळे व्यक्‍ती आणि वस्तुंची एका जागेवरून दुस-या जागी वाहतुक – TRANSFER ही एक अटळ अपरिहार्यता बनलेली आहे. तथाकथित “कडक लॉक डाऊन” मध्येही जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याकरिता – यात अन्नधान्य भाजीपाला आले, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वैद्यकिय सेवा, स्वच्छता सेवा आल्या – वाहतुक चालू ठेवण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. कारण आता आपण शिकार आणि कंदमुळे शोधून, खाऊन त्यावर उदरनिर्वाह करू शकत नाही, आपली खेडीही आता स्वयंपूर्ण राहिलेली नाहीत.

सर्वांना हे ठामपणे माहीत आहे की सोशल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन हे तात्पुरते उपाय आहेत, यांनी काही विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाहीए. हा विषाणू बहुतांश बाधितांत अत्यंत सौम्य लक्षणे निर्माण करीत असल्याने तो लॉकडाऊन काळातही कळत नकळत होणा-या प्रसाराद्वारे पृथ्वीतलावर काहीशा भूमीगत अवस्थेत राहणारच आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंग/ लॉकडाऊन कार्यान्वित असेपर्यंत या विषाणूचा प्रसार व यामुळे होणारे मृत्यु काही प्रमाणात आटोक्यात राहतील. लॉकडाऊन उठवल्याबरोबर लोक परत एकमेकांत मिसळणे चालू झाल्यावर या श्वासाद्वारे – खोकल्या – शिंकल्यातून – हवेद्वारे पसरणा-या विषाणूचा प्रसार परत जोमाने सुरू होतो आहे – हे आपण अनुभवतो आहोतच.
ज्याअर्थी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनने हा COVID – 19 कोरोनाविषाणू जगातून नष्ट होणार नाही – त्याअर्थी हे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन शिथिल केल्यास वा उठवल्यास या विषाणूचा प्रसार आणि नरसंहार परत जोरदारपणे सुरू होईल हे स्वाभाविक आहे. त्यामुळे तार्किकदृष्ट्या असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की COVID – 19 वर प्रभावी लस वा औषधोपचार उपलब्ध होईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग – लॉकडाऊन धोरण चालू ठवावे लागेल. आणि हे सत्य असेल तर हे धोरण किमान दीड ते दोन वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत चालू ठेवावे लागेल. कारण सध्याच्या घडीला COVID – 19 करीता प्रभावी लस वा औषधोपचार उपलब्ध नाही व ते जागतिक स्तरावर सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध होण्यासाठी अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांचे मत आहे.

आता आपण वळू या लॉकडाऊनच्या फायदे – नुकसानीच्या हिशेबाकडे. लॉकडाऊनमुळे कोव्हिडच्या केसेस कमी होतात – आणि लॉकडाऊन काढल्यास त्या वाढतात असे काहीजण म्हणतात, त्यात थोडेबहुत तथ्य असेलही. पण आपल्याला कोव्हिड केसेस वाढण्या-कमी होण्याशी खरंच काही देणं – घेणं आहे का? माझं म्हणणं आहे – कोरोनाच्या केसेस वाढल्या तरी त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण
१. बहुसंख्य कोरोना विषाणूग्रस्त व्यक्तींमध्ये अगदी सौम्य स्वरूपाची सर्दी पडशासारखी लक्षणे आढळताहेत.
२. COVID -19 या विषाणूसंसर्गामुळे होणा-या आजारातून “बरे” होणाऱ्यांची संख्या ही या आजारामुळे “मृत्युमुखी” पडणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे.
३. COVID -19 या विषाणूसंसर्गामुळे होणारा आजार हा बरा झाल्यानंतर ब-या झालेल्या व्यक्तीमध्ये सर्वसाधारणतः कोणतेही कायमचे अपंगत्व मागे ठेवत नाही.

आपण चिंता केली पाहिजे ती कोव्हिडमुळे होणा-या मृत्यूंची – जर ते खरोखरच मोठ्या प्रमाणात होत असतील, तर आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे मृत्यू आपण भारतात विविध कारणांनी होणा-या, तसेच सर्व कारणांनी होणा-या मृत्यूंच्या परिप्रेक्ष्यात पाहू या : 

१. भारतात २०१७ च्या मृत्यूविषयक सांख्यिकीय माहितीनुसार दिवसाला सरासरी २५२०७ लोकांचा विविध कारणांनी मृत्यू झालेला आहे. कोव्हिड १९ ने भारतात आजपर्यंत (१ जुलै २०२०) दिवसाला अधिकात अधिक मृत्यू ४६८ (२३ जून २०२०) झालेले आहेत. – भारतातील कोव्हिड १९ ची मृत्यू-सांख्यिकीय माहिती फार अचूक आहे अशातला भाग नाही, पण सध्यातरी आपल्या हातात तीच सर्वाधिक विश्वसनीय माहिती आहे.
याचा अर्थ आजपर्यंत भारतात एका दिवसात होणा-या एकंदर मृत्यूंपैकी कोव्हिड १९ चा वाटा २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा आकडा अर्थातच काही दिवसांनी वाढू शकतो, पण कोव्हिड १९ साथ सुरू झाल्यापासून पाच महिन्यांनंतरचा हा आकडा आपल्याला कोव्हिड १९ ने भारतात खरोखरच “हाहाकार माजवला आहे का” “कहर केला आहे का” याविषयी विचार करायला लावतो.

२. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी २६ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या माहितीनुसार २०१७ ते २०१९ या काळात मार्च महिन्यात मुंबई शहरात विविध आजारांनी मृत्युमुखी पडणा-यांची सरासरी संख्या ७४६७ होती. मार्च २०२० मध्ये ही संख्या ५६६९ इतकी आहे. यात विविध आजारांनी मृत्यू पावणारे रुग्ण आहेत.. यात हार्ट अटॅकने मृत्यू पावणारे रुग्ण आहेत, किडनीच्या आजारामुळे मरणारे आहेत….अशा सर्व आजारांनी मरणा-या रुग्णांची मार्च २०२० मधील संख्या(५६६९) ही मार्च २०१७ ते २०१९ मधील सरासरीपेक्षा (7467) कमी आहे. आता तार्किकदृष्ट्या विचार केला तर कोरोनाने खरोखरच कहर केला असेल तर ही सर्व आजारांनी मरणा-या रुग्णांची मार्च २०२० मधील संख्या ही मार्च २०१७ ते २०१९ मधील सरासरीपेक्षा जास्त असायला हवी. कारण या काळात हार्ट अटॅकने किंवा किडनीच्या आजारामुळे मरणा-यांची संख्या साधारणतः मागच्या वर्षीच्या सरासरीइतकीच रहायला हवी. ती उलट कमी झाली आहे…. आता एकंदर मृत्यूसंख्या कमी होण्याचे एक कारण म्हणजे मार्च २०२० मध्ये रस्त्यावरील वाहतुक पूर्ण बंद आहे. त्यामुळे अपघातमृत्यूंचे प्रमाण या काळात शून्य झाले… पण तरीही खरोखरच कहर केला असेल तर ही संख्या निदान मागच्या वर्षीइतकीच तरी रहायला हवी…. ती वाढली नाही याचा अर्थ मागच्या वर्षी जेवढे मृत्यू हार्ट अटॅकने किंवा किडनीच्या आजारामुळे झालेत, तेवढेच यावर्षी झालेत पण यावर्षी आपण त्यांपैकी काही लोकांची कोरोनाविषयक चाचणी केल्याने आपण त्यांना “कोरोनामुळे” झालेले मृत्यू म्हणतो आहोत….

३. २०१७ च्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार भारतात वर्षभरात ५६२७७ लोकांचा क्षयरोगाने मृत्यू झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्यामते हा आकडा भारतातील प्रत्यक्ष क्षयरोगमृत्यूच्या आकड्यापेक्षा फारच छोटा आहे (याचे कारण भारतातील मृत्यूनोंदीतील असंख्य चुका) – जागतिक आरोग्य संघटनेच्यामते भारतात वर्षभरात दोन ते तीन लक्ष लोक क्षयरोगाने मृत्यू पावत असावेत. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून पाच महिन्यांत भारतात आतापर्यंत (१ जुलै २०२०) सुमारे १७००० लोक कोरोनाने मृत्युमुखी पडलेत.

४. जगभरात रस्त्यावरील अपघातात वर्षभरात सरासरी १२ लक्ष लोक मृत्युमुखी पडतात. भारतात सुमारे दीड लक्ष लोक रस्त्यावरील अपघातात वर्षभरात मृत्युमुखी पडतात. कोरोनाने गेल्या सहा महिन्यात जगात सुमारे पाच लक्ष तर भारतात १७००० लोक मृत्यू पावलेत.

५. कोरोनाविषाणूसंसर्गाशी संबंधित मृत्यूंचा अधिक खोलात – तपशिलात जाऊन विचार करता असे दिसून येते की यातील बहुतांश मृत्यू हे वयोवृद्ध व इतर जुनाट, दुर्धर आजारांनी (उदा हृदयविकार, श्वसनसंस्थेचे विकार, कॅन्सर, डायलिसिस चालू असलेले रुग्ण) ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये झालेले आहेत.

आता काही लोक म्हणतील की भारतातील कोरोना मृत्यूदर कमी असण्याचे कारण लॉकडाऊन आहे – यात फारसे तथ्य वाटत नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉक डाऊन भारतात फार मर्यादित काळ शक्य आहे – ते प्रदीर्घ काळ चालू ठेवणे प्रॅक्टिकल नाही – हे आपण गेल्या दोन महिन्यांत अनुभवले आहे. कितीही आटापिटा केला तरी आपण लोकांची रस्त्यावर होणारी गर्दी थांबवू शकलेलो नाही – ते भारतात प्रदीर्घ काळ शक्यच नाही. – तरीही भारतातील कोरोना मृत्यूदर कमी आहे – आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करूनही इंग्लंड किंवा बेल्जियमचा कोरोना मृत्यूदर काही कमी झाल्याचे उदाहरण नाही.

भारतात बहुसंख्य कोरोना विषाणूग्रस्त व्यक्तींमध्ये अगदी सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळताहेत. याला भारताय वंशाच्या लोकांची विशिष्ट जनुकीय रचना, भारतातील लोकसंख्येची जडणघडण (पाश्चिमात्य देशांच्या तुलनेने तरुण लोकांचे लोकसंख्यतील प्रमाण जास्त असणे), पूर्वी कोरोनासदृश विषाणूंच्या संसर्ग झाल्याने आलेली रोगप्रतिकारशक्ती, BCG सारखी लस सर्वांना दिल्यामुळे अनेक आजारांविरुद्ध तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती अशी अनेक कारणे असावीत. कदाचित मूळच्या अतिजहरील्या कोरोनाविषाणूमध्ये काही जनुकीय परिवर्तन होऊन भारतातील लोकांमध्ये संक्रमित होणारा कोरोनाविषाणू हा थोडा कमी जहरीला असावा असाही एक कयास – मतप्रवाह आहे. कदाचित भारतातील गरमीमुळे (सरासरी तापमान जास्त असल्यामुळे) कोरोनाविषाणू त्या गरमीमुळे हतप्रभ होत असावा असेही एक कारण सांगितले जाते. कारण काहीही असो, भारतात कोरोनाविषाणूसंसर्गानंतर गंभीर स्वरूपाच्या आजार निर्माण होणा-या रुग्णांचे व कोरोनामुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण पुष्कळच कमी आहे.

आता क्षयरोगाचा प्रसारही आजारी माणसाच्या श्‍वासातून, खोकल्यातून उडणा-या शिंतोड्यांद्वारे, आजारी माणसाशी आलेल्या जवळून संपर्कातून होतो. म्हणजे क्षयरोगाचा प्रसार हा कोरोनासारखाच होतो. क्षयरोगाचा मृत्यूदरही कोरोनासारखाच आहे – किंबहुना तो थोडा जास्तच आहे. हे आपण पाहिले. पण क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी कधी लॉकडाऊन केल्याचे काही ऐकिवात नाही.
भारतात सुमारे दीड लक्ष लोक रस्त्यावरील अपघातात वर्षभरात मृत्युमुखी पडतात. रस्त्यावरील वाहतुक बंद केली तर वर्षभरात दीड लाख भारतीय लोकांचा किंवा चार महिन्यांत सुमारे ३५००० भारतीय लोकांचा मृत्यू आपण नक्की टाळू शकू. ही संख्या भारतात कोरोनाने पाच महिन्यांत झालेल्या मृत्यूसंख्येच्या दुप्पट आहे. पण तरीही रस्त्यावरील अपघातात होणारे मृत्यू थांबवण्यासाठी लॉकडाऊन केल्याचे काही उदाहरण नाही. आणि कोरोनाने होणारे मृत्यू वाहतुक थांबवूनही थांबत नाहीत, तरीही ते थांबवण्यासाठी वाहतुक थांबवण्याचा अट्टाहास कशासाठी?

“पण या वाढणा-या केसेसचा आणि मृत्यूंचा दोष आपल्या भाळी लागू नये….”

लॉकडाऊनची आर्थिक मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागलेली आहेच. लॉकडाऊनमुळे झालेले प्रवासी मजुरांच्या दुर्दैवाचे दशावतार आपण पाहिले. लॉकडाऊनमुळे अनेक कोव्हिडेतर रुग्णांना – उदा फ्रॅक्चर झालेले रुग्ण, लकवा मारलेले रुग्ण, कॅन्सर कीमोथेरपी चालू असलेले रुग्ण, डायलिसिस चालू असणारे रुग्ण यांना वेळेवर प्रवाससाधन न मिळाल्याने उपचार मिळण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला – (गंमत म्हणजे यांपैकी काही मृत्यू हे कोरोनामृत्यू म्हणून नोंदले गेले – कारण त्यांना वेळीच उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना कोरोनाने गाठले), अनेकांना कायमचे अपंगत्व आले. प्रवाससाधन न मिळाल्यामुळे अनेक बालकांचे लसीकरण खोळंबले, गरोदर महिलांच्या प्रसूतिपूर्व नियमित तपासण्यांवर बंधने आली. युनिसेफ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या संयुक्त लेखात मांडलेल्या आकडेवारीनुसार येत्या ६ महिन्यांत या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जगभरात १७ वर्षांखालील जवळजवळ १२ लक्ष मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. लॉकडाऊन काळात प्रवाससाधनाअभावी अवैध – अवैद्यकीय गर्भपातांचे प्रमाण वाढले – यामुळे अशा महिलांचा मृत्यू होण्याचे वा त्याच्यात गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढले.
लॉकडाऊनचे कथित फायदे आणि आपण प्रत्यक्ष बघत असलेले नुकसान याचा विचार करता केवळ काही कोव्हिड-मृत्यू रोखण्यासाठी इतर अनेक कारणांमुळे होणारे मृत्यू कैक पटींनी वाढवणारा, गरिबी आणि बेरोजगारी देणारा, लोकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम करणारा हा प्रदीर्घ लॉकडाऊन कसाकाय स्वीकारार्ह हितकारक आहे यामागचे तर्कशास्त्र मला काही कळत नाही. आता आपण भारतात कोरोना साथीच्या अशा स्टेजमध्ये आहोत की लॉकडाऊन करा किंवा नका करू पुढील काही दिवसांत कोरोना केसेस आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढणारच आहेत – ही एक श्वासमार्गाने पसरणा-या विषाणूने निर्माण केलेली जागतिक महामारी आहे – तिला आपण कितीही आटापिटा केला तरी रोखू शकत नाही. पण या वाढणा-या केसेसचा आणि मृत्यूंचा दोष आपल्या भाळी लागू नये या कारणासाठी हा लॉकडाऊन वाढवला जात असेल, (म्हणजे आम्ही तर ल़ॉकडाऊन केला होता- तुम्हीच तो व्यवस्थित पाळला नाहीत म्हणून केसेस वाढताहेत असे काहीसे बालिश स्पष्टीकरण देऊन जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी लॉकडाऊन वाढवला जात असेल) तर ते भारताचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून आपण अजून एक गोष्ट अनुभवतो आहोत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या केसेस वाढल्यामुळे विविध शहर, जिल्हा प्रशासनाने किंवा काही राज्य सरकारांनीही ७ दिवस वा १५ दिवस परत लॉकडाऊन केला. काही शहरांत नागरिकांनी असाच चार दिवस वगैरे स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला. हा एक मोठा विनोद आहे – या चार दिवस ते १५ दिवसांच्या अधिकच्या (TOP UP) लॉकडाऊनचा कोरोना साथ आटोक्यात आणण्याशी सुतराम संबंध नाही. तो केवळ प्रशासनाने किंवा नागरिकांनी सभोवताली काहीतरी भयंकर घडते आहे, त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भाबड्या भावनेतून वा काहीतरी केल्याचे दाखवले पाहिजे या प्रशासनिक चातुर्यातून निर्माण झालेला प्रतिसाद आहे.
कोरोनाविषाणूच्या संसर्गप्रतिबंधाकरिता लॉकडाऊन चालू ठेवणे आवश्यक आहे का यावर भावनेच्या आहारी न जाता, तात्कालिक राजकीय नफा-तोट्याचा विचार न करता गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे रस्त्यावरील अपघातात भारतात दरवर्षी दीड लक्ष लोक मृत्युमुखी पडतात हे कठोर सत्य पचवूनही आपण रस्त्यावरील वाहतुक थांबवत नाही – लॉकडाऊन करत नाही, त्याचप्रमाणे कोरोनाविषाणूसंसर्गामुळे भारतात वर्षभरात काही हजार लोकांचा मृत्यू होणार हे कठोर सत्य पचवून लॉकडाऊन उठवणे अधिक श्रेयस्कर आहे.

डॉ. चंद्रशेखर साठये
(shekhar1971@gmail.com)

(लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबागस्थित अस्थीशल्य विशारद असून सध्या ते स्वतः कोविड-१९ वॉर्ड साठी जिल्हा शासकीय रुग्णालयास स्वेच्छेने सेवा देत आहेत)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *