Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

भाजपला गावला मुख्यमंत्री पदाचा चेहरा !! राज ठाकरे असणार भाजपचा पुढला मुख्यमंत्री पदाचा मोहरा !!!

‘संघ’ मांडू पाहतोय नवा डाव…

राज्यात भाजपची सध्या मोठी गोची झालीय. थोडेथोडके नव्हे तर चक्क १०६ आमदारांचे पाठबळ असूनही भाजपला राज्यात सत्ता आणता येत नाहीये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबर धक्का बसला. कारण मुंडावळया बांधून तयार बसलेल्या फडणवीस यांचा लग्नाआधीच घटस्फोट झाला. यानंतर देवेंद्र यांनी ओढावून घेतलेली ही परिस्थिती जरी स्वीकारली असली तरी त्यांनी मागील पावणेदोन वर्षांत विविध राजकीय डावपेच टाकण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. आणि या साऱ्या खालावलेल्या आलेखाचा लेखाजोखा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर व १०६ आमदारांसमोर आलाच. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गुळगुळीत-मुळमुळीत झालेल्या नेतृत्वाला आता पक्षात कोणी जुमानत नाहीये. फडणवीस मुख्यमंत्री पदावर ‘मी पुन्हा येईन’ च्या स्वप्नांचं पांघरूण बदलायला तयार नाहीत. थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांचा नारायण राणे झालाय असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण  ठरू नये.

नुकतीच केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेल्या नारायण राणे यांचीही कथा काहीशी अशीच. शिवसेना-भाजप युतीचं सरकार राज्यात असताना शेवटी-शेवटी उणंपुरं ६ महिन्यांचं मुख्यमंत्रीपद लाभलेले  राणे हेही १९९९ पासून जवळपास ३ वर्ष सतत असेच ‘मी पुन्हा येईन’ चा घोषा लावून होते. मात्र नंतर ते सेनेला सोडून थेट विलासराव यांचा हात धरून सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन काँग्रेस वासी झाले. त्यानंतर १५ वर्ष सत्तेची फळे चाखत आणि अशोक चव्हाणांपासून पासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सगळ्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पद उपभोगून नंतर दोनदा सेनेने स्वाभिमान मोडल्यावर चक्क भाजपवासी झाले आणि आता तर थेट केंद्रीय मंत्री सुद्धा !!

असो, अर्थात देवेंद्र हे राणे यांच्यासारखे इकडून तिकडे उड्या मारणार नाहीत. पण एक मात्र खरे आहे की दिल्लीश्वरांकडे देवेंद्र यांचे पारडे आधी सांगितल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे. मध्यंतरी त्यांना एकदम केंद्रीय मंत्री तेही अर्थमंत्री बनण्याची स्वप्न पडत होती. तदनंतर थेट पंतप्रधान बनण्याचा त्यांचा मनोदय होता. स्वप्न पाहणे गुन्हा नाही पण अजून तरी त्यास खतपाणी मिळालेले नाही. अर्थात संघ काहीही करू शकते म्हणा !! मागील काही दिवसांच्या राजकीय हालचाली पाहता तसाच एक नवीन डाव आता संघाच्या बिळातून हळूहळू बाहेर येतोय. तो डाव म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेसही भाजपात युती करून सामावून घेणे. इतकेच नव्हे तर जर उद्धव ठाकरे ऐकले नाहीच आणि त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडली नाहीच तर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत उद्धव विरुद्ध राज असाच प्रचार पेटवण्याचा संघ आणि भाजपचा मनसुबा दिसतोय. उद्धव विरुद्ध राज या दुकलीचा सामना बघायला सगळ्यांनाच आवडतो म्हणा. ती कुस्ती रंगतेही चांगली. लोकांचे मनोरंजन होते आणि ठाकरे घराण्याची लक्तरे वेशीवरही टांगली जातात.

मातोश्रीच्या भिंती आडील सगळ्या भानगडी बाहेर पडतात. भर सभेत वडे-सूप निघतं. भोक पडलेले टमरेल निघतं. अगदी भिजलेल्या गोधड्या निघतात. उष्टी खरकटी बाहेर पडतात. याचा नमुना २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात अख्या महाराष्ट्राने किंबहुना देशाने पाहिला. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही या वादाची ठिणगी पेटली की लोकांसमोर बिन पैशाचा तमाशा उभा राहायचा आणि हेच दोघे नेते जनतेकडून मतांची भिक्षा मागायचे आणि मातोश्रीच्या आडील सगळी अंडीपिल्ल बाहेर काढायचे. त्याच जोरावर भाजप, राष्ट्रवादी आणि काँगेस आपापली मतांची खळगी मात्र भरून घ्यायचे ! आता देखील तसेच प्रकार होऊ लागल्याचे चित्र आहे. फक्त शिवसेनेला टार्गेट करतात म्हणून राजकीय अस्तित्व जवळपास संपलेल्या नारायण राणे यांना थेट केंद्रीय मंत्री बनवले गेले. मुळात आधीपासूनच भाजप मध्ये स्वतःची अशी ताकद काहीच नाही, उसनं अवसान आणायचं आणि बेडकीचा वाघोबा करायचा त्यामुळे भाजप स्वतःची अशी ओळख निर्माण करू शकली नाही. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर देवगडातील ज्या अप्पासाहेब गोगटे यांनी आयुष्यभर नारायण राणे यांच्या प्रवृत्तीला विरोध केला, ज्या मुंडे-महाजन जोडीने राणेंसारख्या जहाल नेत्यांना भाजप मध्ये कधी येऊच दिले नाही, ज्या भाजपने केवळ संघाची शिकवण रुजवत पक्ष वाढवला त्या भाजपची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात काय अवस्था झालीय ते संबंध महाराष्ट्र पाहतोय ! आज महाराष्ट्रातला भाजप नारायण राणे चालवतात अशी परिस्थिती निर्माण झालीय. जुने जाणते भाजपनेते व कार्यकर्ते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

सध्या दोन गुजराती नेत्यांच्या भोवती पिंगा घालणाऱ्या भाजपला शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करायचे असेल तर राज ठाकरे यांचा करिष्मा सोबत असण्याची आवश्यकता वाटते. म्हणून अधिक वेळ जाऊ नये म्हणून भाजप आणि संघ लवकरच एक नवा फॉर्मुला आणतायत, उद्धव विरुद्ध राज हा तो फॉर्म्युला आहे. याची चुणूक मागील काही दिवसंपासूनच्या घडामोडींवरून दिसतेय. सर्व महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन भाजप मार्फत सुरु झाले असल्याचे खात्रीलायकरित्या कळते. ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशी प्रमुख शहरे फिरल्यावर राज ठाकरे यांचा तळ वर्षभर मुंबईत असणार आहे. राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या २०२२ च्या सर्व महानगरपालिका निवडणूका राज भाजप सोबत युती करून लढवणार. त्यात शिवसेनेला पराजीत करणे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर असणार आणि ठेवले जाणार हेही नक्की.

ठाकरेच ठाकरेंना बदनाम करतोय म्हटल्यावर महाराष्ट्रातील जनतेला हा तमाशा नक्की आवडणार यात काही शंकाच नाही. आणि त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांची देखील पंचाईत होणार. जोरदार आक्रमक भाषण करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसे पराजीत मनोवृत्तीचे आणि पळपुटे आहेत हे आपल्या खास शैलीत मांडणार. त्या बदल्यात त्यांच्या मनसेला दोन चार जागा भाजपकडून बक्षीस मिळणार आणि त्या आशेवर हा अवलिया आपल्याच सख्या चुलत भावाची नाचक्की करत फिरणार, त्यानंतर लगेच लोकसभा अन विधानसभांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आणि त्यात राज ठाकरे यांना आकर्षक आणि गर्दी खेचणारा नेता म्हणून भाजप डोक्यावर घेणार. मग लोकसभा निवडणुकात राजच्या डोक्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून सरताज चढवला जाणार. विशेषतः पूर्ण लोकसभा आणि विधानसभा राजला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रमोट करणार आणि निवडणूक संपली की राज ठाकरेंना बाजूला करणार आणि चंद्रकांत पाटील किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करून जातीय समीकरण साधणार आणि मग अखेर राज ना बाजूला सरणार !!! संघ काहीही करू शकते !!! हे असेच होणार पहा, मराठी घरात सुरुंग लावले जाणार आणि भाजप आपला फायदा उचलणार !!!! तेव्हा आताच जागे व्हा आणि लोकहिताचा धागा व्हा !!!
तूर्तास शहाण्यास अधिक सांगणे न लगे !!!!

– मल्हारराव मोहिते (वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक).                                                           E-mail : malharrao1955@gmail.com

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *