आधीच मर्कट त्यात राजाच्या साथीने चढली झिंग; सत्तेच्या सोपानावर मारली त्याने जोरदार पिंक
एक होता राजा आटपाट नगरीचा, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कृपेने त्याला मिळाला राज्याचा पूर्ण कारभार, विरोधकांनीही त्याच्या आई वडिलांच्या चांगल्या स्वभाव आणि कीर्ती मुळे त्या राजाला सत्तेचा सोपान चढवला, राजा तासन तास विचार करायचा की राज्याचे भले कसे होईल पण घरातून बाहेरच नाही पडायचा ! तशी ही त्याची जुनी खोड, घरबसल्या तारे तोडायचे !! त्याचेच राज्य आणि तोच राजा त्यामुळे त्याची प्रजा त्याला काही म्हणायची नाही, राज्यात लोकशाही होती दर वर्षी एकदा दसरा दिवाळी संपली की राजाची परीक्षा असायची त्यात तो कसा पास होणार आणि पुन्हा राज्य कसे चालवणार याबाबत राज्यातील जनता चिंतेत असायची मात्र राजा दरवर्षी आई वडिलांच्या पुण्याईने सत्तेचा सोपान राखायचा राज्यातील जनता मग हुश्श करायची, या सगळ्या काळात राजा काम चांगले करायचा पण आपल्या आप्तस्वकीयांपासून परेशान असायचा, त्यांचा त्रास कमी व्हावा आणि कोणावरच विश्वास न राहिल्याने राजाने एक मर्कट आपल्या सेवेत ठेवला, त्याचं नाव ‘वटवट्या’. राजाला गाण्याचा भारी शौक तो सारखा मधू मिलिंद जय जय ही बंदिश गायचा आणि काही झाले तरी वटवट्या ला बोलवायचा, हळू हळू जनतेलाही वटवट्याचं महत्व कळू लागलं त्यामुळे जो तो त्याच्याकडे जायचा. आधीच मर्कट त्यात सत्तेचा सोपान असलेल्या राजाचा फर्जंद मग काय सगळ्या फांद्या आपल्याच म्हणत तो स्वैराचार करू लागला, छान छान कपडे आणि गाड्या उडवू लागला, राज्याचं हित आपणच करू शकतो असे भासवु लागला, आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी त्याची अवस्था झाली, राज्याचा सगळ्या विषयांना त्याने फांद्यांप्रमाणे आखले आणि जे विषय त्याला कळत नव्हते ती फांदी छाटायला सुरुवात केली, राजाला कळेना असे का होते सगळे आपल्या विरोधात का जातायत, राजा तसा हुशार होता त्याने मग एक जासूस त्या मर्कटाच्या मागे लावला आणि त्याच्या करामतीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. झाले मर्कटाची सगळी पोल खुलली आणि राजाला आपले नुकसान कशामुळे झाले ते कळले. पण, तो पर्यंत खूप उशीर झाला होता. राज्य ही हातातून जायची वेळ आली आणि आई वडिलांच्या कृपेने कमावलेली माणसंही !! राजा आता सत्तेच्या सोपानावर आहे खरा पण एकटा !! आता मर्कट सगळं राज्य चालवण्याच्या आवेशात वावरतो आहे पण त्यालाही कोणी विचारत नाही, आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला त्यामुळे सगळा गोंधळ झाला. आता आई वडिलांच्या पुण्याईने मिळवलेल्या राज्याचा राजाने वाजवलाय बाजा आणि स्वतःची केली पुंगी जी आता हाती आहे तेल लावलेल्या पैलवानाच्या हाती आणि तो राजाला नाचवतोय दिन राती !!!
(सदर काल्पनिक कथेचा आजच्या राज्य सरकारशी काडीमात्र संबंध जोडू नये तसा जुळत आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
– मल्हारराव मोहिते (वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक) E-mail : malharrao1955@gmail.com
(बंडखोर ब्लॉग मधील लेखांत व्यक्त झालेली मतं ही त्या लेखकाची वैयक्तिक मतं असून महाराष्ट्र वार्ता हे फक्त एक माध्यम आहे.)