भारताने कोळसा उत्पादनात नवा विक्रम; सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टनांचा ऐतिहासिक टप्पा गाठला
नवी दिल्ली, दि. २२ : देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कोळसा उत्पादनात भारताने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. २० मार्च २०२६ रोजी भारताने सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा यशस्वीपणे पार केला. या यशामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ मिळाले असून औद्योगिक विकासासाठी आवश्यक इंधन पुरवठा सक्षमपणे सुरू ठेवण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे.
ऊर्जा मागणी पूर्ण करण्यास मोठे पाठबळ
देशातील वाढती वीज व औद्योगिक मागणी लक्षात घेता कोळसा उत्पादनाचा हा स्तर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करताना कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांना आवश्यक इंधन उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. यामुळे वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा राखणे शक्य झाले असून वीज पुरवठा अधिक स्थिर राहण्यास मदत झाली आहे.
समन्वित प्रयत्नांचा परिणाम
या यशामागे कोळसा क्षेत्रातील विविध घटकांचा समन्वित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचा ठरला आहे. उत्पादन, वाहतूक, वितरण आणि साठवण या संपूर्ण मूल्य साखळीत काटेकोर नियोजन आणि कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे उत्पादनात सातत्य राखत विक्रमी पातळी गाठणे शक्य झाले.
पारदर्शक आणि कार्यक्षम व्यवस्था
कोळसा मंत्रालयाने स्थिर, पारदर्शक आणि कामगिरीआधारित कार्यपद्धती विकसित करण्यावर भर दिला आहे. सक्रिय धोरणात्मक उपाययोजना, नियमित देखरेख आणि सर्व भागधारकांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे कोळशाची उपलब्धता सुरळीत राहिली आहे. उद्योग, वीज निर्मिती आणि इतर क्षेत्रांना अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरत आहे.
आर्थिक विकासाला चालना
कोळसा उत्पादनातील या वाढीमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे. औद्योगिक उत्पादन, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होत असून रोजगारनिर्मितीलाही गती मिळत आहे.
‘विकसित भारत २०४७’कडे वाटचाल
देशाला ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे नेण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील स्वयंपूर्णता अत्यावश्यक मानली जात आहे. कोळसा उत्पादन वाढवून देशांतर्गत क्षमतेचा पूर्ण वापर करणे, ऊर्जा पुरवठा लवचिक ठेवणे आणि शाश्वत आर्थिक विकास साधणे या दिशेने सरकारची ठोस पावले सुरू आहेत.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारताने जागतिक ऊर्जा क्षेत्रात आपली भक्कम उपस्थिती पुन्हा अधोरेखित केली असून भविष्यातही ऊर्जा सुरक्षिततेसाठी देश सक्षमपणे पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
