उच्च व तंत्रशिक्षण संस्थांच्या ऊर्जा स्वावलंबनाकडे मोठे पाऊल
मुंबई, दि. १५ : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांना स्वच्छ, शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतील एकूण १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला.
यावेळी प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभाग, यंत्रणा आणि अंमलबजावणी संस्थांनी परस्पर समन्वय राखून कार्य करावे तसेच आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.
महाप्रीत आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यात सौरऊर्जेच्या वापरासंदर्भात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
सादरीकरणानुसार, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये एकूण ४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जाकरण करण्यात येणार असून त्यामध्ये ५० टक्के बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीचाही समावेश असेल. या उपक्रमांतर्गत १५ मेगावॅट नेट मीटरिंग, ५ मेगावॅट बिहाइंड-द-मीटर आणि २५ मेगावॅट ओपन ॲक्सेस या तीन स्वतंत्र माध्यमांतून सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या प्रकल्पामुळे शैक्षणिक संस्थांचा वीज खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार असून पारंपरिक वीजपुरवठ्यावरचे अवलंबित्वही घटेल. तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना मिळून संस्थांच्या दीर्घकालीन ऊर्जा व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक व्यवहार्यता तपासणी, विकासकाची निवड, आर्थिक पूर्तता, प्रकल्पाची स्थापना, कार्यान्वयन तसेच दीर्घकालीन संचालन आणि देखभाल अशा विविध टप्प्यांचा समावेश असलेला १८ महिन्यांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
बैठकीत आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानुसार, तंत्रशिक्षण संचालनालयासोबत सामंजस्य करार पूर्ण झाला असून छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड येथील १९ ठिकाणांचे नमुना सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच प्रकल्प व्यवस्थापन युनिट नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रा. लि. यांना कार्यादेश देण्यात आला आहे. ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रकल्पासाठी विकासक निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक नियोजनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आवश्यक निधीपैकी किमान १० टक्के निधी विद्यमान वीज यंत्रणा बळकट करण्यासाठी उपलब्ध करून देणे, डिस्कव्हर्ड रेटनुसार वीज खरेदी करार करणे, महाप्रीतमार्फत वित्तीय सहकार्य उपलब्ध करून देणे, तसेच तंत्रशिक्षण संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या स्तरावर केंद्रीकृत पेमेंट सिक्युरिटी यंत्रणा विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संयुक्त कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक समन्वयावरही भर देण्यात आला.
या बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, महाप्रीतचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांना ऊर्जा स्वावलंबनाकडे नेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, शाश्वत विकास, हरित ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा हा प्रकल्प राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी नवे पर्व ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
