विशेष फेरीसाठी प्रवेश निश्चितीची मुदत आता ८ जुलैपर्यंत
मुंबई, दि. ६ : राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, विशेष फेरीत महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून उर्वरित विद्यार्थ्यांची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील वाहतूक आणि शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावरील ‘प्रवेश निश्चित करा’ या पर्यायाचा वापर करून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश निश्चित करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १० जुलै २०२६ रोजी राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्या आधारे पुढील प्रवेश फेरीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी, पालक तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व आवश्यक कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी सर्व संबंधितांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती, सुधारित वेळापत्रक तसेच आवश्यक सूचना अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली असून, विद्यार्थी व पालकांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

