नागपूरच्या काटोल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालयास मंत्रिमंडळाची मंजुरी; दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश
मुंबई, दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर आणि अमरावती विभागातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, आंबा, लिंबू, पेरू यांसारख्या प्रमुख फळपिकांसह कमी पाण्यावर तग धरणाऱ्या आवळा आणि सिताफळ या फळपिकांच्या लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात फळे, भाजीपाला आणि फुलशेतीची मोठी विविधता असल्याने या भागात उद्यानविद्या शिक्षण आणि संशोधनासाठी स्वतंत्र महाविद्यालयाची आवश्यकता दीर्घकाळापासून व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर काटोल येथे स्थापन होणाऱ्या शासकीय उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये फळपिके, भाजीपाला, फुलशेती, अन्न प्रक्रिया तसेच मूल्यवर्धन या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यानविद्या क्षेत्रातील उच्च शिक्षण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषीपूरक उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्यानविद्या क्षेत्राशी संबंधित संशोधकांसाठीही हे महाविद्यालय महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
या महाविद्यालयात दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाची संधी आणि उद्यानविद्या क्षेत्रातील विविध विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या कार्यासाठी शिक्षकवर्गातील २९ पदे आणि शिक्षकेतर २२ पदे, अशी एकूण ५१ नियमित पदांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार शिक्षकवर्गीय (गट-अ) ५ पदे, शिक्षकेतर (गट-क) ८ पदे आणि शिक्षकेतर (गट-ड) २२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी तसेच मंजूर पदांच्या वेतन आणि अनुषंगिक खर्चासाठी राज्य शासनाने ₹ १२२ कोटी ३२ लाख इतक्या आर्थिक तरतुदीस मान्यता दिली आहे. राज्यात उद्यानविद्या क्षेत्राचा विस्तार, फळपिकांवरील संशोधन, मूल्यवर्धन उद्योगांना चालना आणि कृषी शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने काटोल येथे सुरू होणारे हे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
