सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी सर्वसमावेशक व विश्वासार्ह धोरणावर भर
मुंबई, दि. १५ : राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येत असलेल्या प्रस्तावित सहकार धोरणात सर्व घटकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून ते अधिक विश्वासार्ह करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
मुंबई येथील राज्य सहकारी बँकेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार धोरणातील प्रस्तावित बदलांच्या अनुषंगाने गठित उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सहकार क्षेत्राशी संबंधित विविध विभागांवरील सादरीकरण करण्यात आले तसेच सहकार व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांच्या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत वापरणे, तसेच शालेय स्तरापासून सहकाराची मूल्ये रुजविण्यासाठी अभ्यासक्रमात सहकार विषयाचा समावेश करण्यावर भर दिला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सहकार व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सहकारी बँका, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांचे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सेवा व सहाय्य क्षेत्र, सौर ऊर्जा, गॅस ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि फूड पार्क यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये सहकारासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण सेवा व रोजगार क्षेत्रात सहकारी संस्थांची भूमिका अधिक व्यापक करत नवकल्पनांना चालना देणे आणि युवापिढीला नव्या संधींमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी कृषी प्रक्रिया उद्योगात सहकारी संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन यामध्ये ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील ग्राहक सहकारी संस्थांचा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेष मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, पुरवठा साखळी आणि प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत जिल्हास्तरावर सहकारी व्यवसाय परिसंस्था उभारणे, राज्यस्तरावर सहकार ब्रँड निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहकारी उत्पादनांचा प्रचार वाढविणे आणि ‘सहकार भवन’ संकल्पनेद्वारे ब्रँडिंग मजबूत करणे यांसारख्या उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
