पुण्यात अग्रेको इंडियाची ४०० कोटींची गुंतवणूक; पुढील १० वर्षांत १ हजार रोजगार निर्माण होणार
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला आणखी बळकटी देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारानुसार पुणे जिल्ह्यात पुढील दहा वर्षांत सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून अंदाजे १ हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे पुण्याचे जागतिक औद्योगिक केंद्र म्हणून महत्त्व अधिक दृढ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करार सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख, व्यापार सल्लागार मार्क बिरेल आणि वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे हे आता जागतिक क्षमता केंद्रांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी महाराष्ट्र आकर्षणाचे केंद्र बनत असून अग्रेको इंडियाचे राज्यात स्वागत आहे. महाराष्ट्रातील सक्षम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगपूरक वातावरणामुळे या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कराराअंतर्गत अग्रेको इंडिया कंपनी पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पाचे काम चालू वर्षात सुरू होणार असून स्कॉटलंडबाहेरील अग्रेकोचे हे सर्वात महत्त्वाचे जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय सहकार्य देण्यात येणार आहे. परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती तसेच इतर औद्योगिक प्रक्रियांमध्ये उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून गती देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजनांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रेको इंडिया कंपनी कार्यक्षम ऊर्जा तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर विशेष भर देणार आहे. विविध उद्योग क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी कंपनीकडून विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे पुणे आणि परिसरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक पुरवठा साखळी जागतिक बाजारपेठेशी जोडली जाणार असून अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत होणार आहे.
राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याशी सुसंगत अशा शाश्वत ऊर्जा आणि तापमान नियंत्रण प्रणाली विकसित करण्यासाठीही कंपनी राज्य शासनासोबत सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. त्यामुळे औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानालाही चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळत असून पुणे हे जागतिक दर्जाच्या उद्योग आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे पसंतीचे केंद्र बनत असल्याचे या करारातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
