भारत सरकारकडून काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान प्रवासाबाबत सावधतेचा इशारा
नवी दिल्ली, दि. २५ : आफ्रिका खंडातील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडा येथे वाढत असलेल्या इबोला विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ही परिस्थिती ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ असल्याचे घोषित केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम, २००५’ अंतर्गत दि. १७ मे २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यासोबतच आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडामध्ये फैलावत असलेल्या ‘बुंदिबुग्यो प्रजाती इबोला विषाणू’च्या उद्रेकाला ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणीबाणी समितीने दि. २२ मे २०२६ रोजी प्रवेश केंद्रांवर आरोग्य तपासणी आणि देखरेख अधिक बळकट करण्यासाठी तात्पुरत्या शिफारशी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, बुंदिबुग्यो विषाणूचा प्रसार आढळलेल्या भागांतून येणाऱ्या आणि तापासारखी लक्षणे असलेल्या प्रवाशांची ओळख, तपासणी, नोंद आणि वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
तसेच नागरिकांनी बुंदिबुग्यो विषाणू प्रभावित भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असेही स्पष्टपणे सुचविण्यात आले आहे. काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडाच्या सीमेलगत असलेल्या दक्षिण सुदानसह इतर काही आफ्रिकी देशांमध्येही या आजाराचा प्रसार होण्याचा धोका वाढल्याचे जागतिक संस्थांनी नमूद केले आहे.
इबोला हा गंभीर स्वरूपाचा विषाणूजन्य रक्तस्रावकारक ताप असून त्याचा मृत्यूदर तुलनेने जास्त मानला जातो. बुंदिबुग्यो प्रजातीमुळे होणाऱ्या या संसर्गात रुग्णांना तीव्र ताप, अशक्तपणा, रक्तस्राव, अवयव निकामी होणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसून येतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील द्रव, रक्त किंवा संपर्कातून हा विषाणू वेगाने पसरू शकतो.
सध्या बुंदिबुग्यो विषाणू प्रजातीमुळे होणाऱ्या इबोला आजारावर प्रभावी लस किंवा विशिष्ट उपचारपद्धतीला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर निदान यालाच सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे.
भारत सरकारनेही या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी महत्त्वाची प्रवासी सूचना जारी केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
याशिवाय, सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत सावधगिरी बाळगणे, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे आणि आरोग्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतात बुंदिबुग्यो विषाणू प्रजातीमुळे होणाऱ्या इबोला आजाराचे अद्याप एकही प्रकरण आढळलेले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, जागतिक स्तरावरील परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून विमानतळांसह विविध प्रवेश केंद्रांवर देखरेख वाढविण्यात आली आहे.
