पारंपरिक कलांच्या जतनासाठी सहकार्याचे आवाहन
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाला भेट देऊन संग्रहालयातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक दालनांचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी संग्रहालयात जतन करण्यात आलेल्या अमूल्य वारशाचे कौतुक करत देशातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
भेटीदरम्यान संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांनी राज्यपालांचे स्वागत करून संग्रहालयाचा इतिहास, स्थापनेपासूनची वाटचाल, विविध संग्रह, संशोधन, संवर्धन आणि जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच संग्रहालयाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी राज्यपालांना दिली.
यानंतर सव्यसाची मुखर्जी आणि संग्रहालयातील क्युरेटर्स यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांनी संग्रहालयातील विविध दालनांना भेट दिली. यामध्ये प्राचीन भारत व विश्व दालन, शिल्पकला दालन, हिमालयीन कला दालन, तसेच लघुचित्रे आणि वस्त्र संग्रहालय यांचा समावेश होता. विविध कालखंडांतील दुर्मिळ कलावस्तू, शिल्पे, चित्रसंग्रह, वस्त्रपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घेत राज्यपालांनी संग्रहालयाच्या जतन आणि संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी संग्रहालयाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत देशातील पारंपरिक आणि लोककलांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी शासन, सांस्कृतिक संस्था आणि समाजाने संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांनी यावेळी सांगितले की, “वस्तू संग्रहालय आपले फिरते संग्रहालय तसेच इतर जनजागृती कार्यक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या समृद्ध वारशाबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचे कार्य करीत असल्याचे” त्यांनी राज्यपालांना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय हे देशातील अग्रगण्य संग्रहालयांपैकी एक मानले जाते. भारतीय इतिहास, कला, पुरातत्त्व, शिल्पकला, लघुचित्रे, वस्त्रपरंपरा आणि विविध सांस्कृतिक वारशाशी संबंधित हजारो दुर्मिळ वस्तू येथे जतन करण्यात आल्या आहेत. संशोधन, संवर्धन, शैक्षणिक उपक्रम आणि फिरते संग्रहालय यांसारख्या माध्यमांतून संग्रहालय विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारशाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
