राज्यातील उद्योजकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई दिनानिमित्त भव्य ‘महाराष्ट्र एमएसएमई परिषद व एमएसएमई पुरस्कार २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २७ जून २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून राज्यातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या परिषदेसाठी ‘संकल्पातून सिद्धीकडे’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञानातील बदल आणि जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उद्योगांना अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत राज्यभरातील सुमारे २ हजार ५०० हून अधिक उद्योजक, विविध वित्तीय संस्था, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, संशोधक तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चासत्रे, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
परिषदेदरम्यान निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा, नवउद्योग विकास, कौशल्यवृद्धी तसेच महिला उद्योजकता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा अभ्यास करून उद्योजकांना स्पर्धात्मक बनविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित आहे. राज्यातील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांवरही यावेळी चर्चा होणार आहे.
परिषदेदरम्यान राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निर्यातवृद्धी, पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया आणि उद्योजकतेतील उत्कृष्ट योगदान यांची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्कारांमध्ये कारागीर व हस्तकला, नेक्स्टजेन एमएसएमई, डिजिटल व कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता, सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, हरित उद्योग, महिला उद्योजक, निर्यात क्षेत्र आणि चॅम्पियन एमएसएमई अशा नऊ प्रमुख श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. चॅम्पियन एमएसएमई पुरस्कार वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये ‘उत्कृष्टता’ आणि ‘कर्तृत्ववान’ अशा दोन उपश्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाद्वारे राज्यातील नवोन्मेषी, तंत्रज्ञानाभिमुख, निर्यातक्षम आणि प्रगत उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासही या पुरस्कारांची मदत होणार आहे.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने परिषदेसाठी सर्व पात्र उद्योजकांना मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून जास्तीत जास्त उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेमुळे उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, वित्तपुरवठ्याचे पर्याय, तंत्रज्ञानातील प्रगती आणि बाजारपेठेतील बदल यांविषयी थेट माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देणे, उद्योजकांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक बनविणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने नमूद केले आहे.

