निर्यात सुरळीत सुरू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. ११ : नेपाळमध्ये भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मंत्रालयाने अशा बातम्या पूर्णपणे चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगत भारतीय आंब्यांच्या आयातीवर नेपाळकडून कोणतीही बंदी घालण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारच्या वनस्पती अलगीकरण व कीटकनाशके व्यवस्थापन केंद्राने (राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना) दि. १० जून २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण जारी करून भारतीय आंब्यांच्या आयातीस परवानगी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. वनस्पती आरोग्यविषयक निर्धारित अटी व निकषांची पूर्तता करणाऱ्या खेपांना नियमितपणे आयात परवाने देण्यात येत असून माल सोडण्याची प्रक्रिया देखील सुरळीत सुरू आहे.
कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातून नेपाळकडे आंब्यांची निर्यात कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण १४९ खेपांमधून सुमारे २,००५ मेट्रिक टन आंब्यांची निर्यात नेपाळमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये केवळ जून २०२६ महिन्यातच आतापर्यंत १८ खेपांमधून २६६ मेट्रिक टन आंब्यांची निर्यात झाल्याची नोंद आहे. यावरून दोन्ही देशांमधील आंबा व्यापार नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, नेपाळ सरकारने अलीकडेच आयात प्रक्रियेसंदर्भातील काही अटींमध्ये बदल केले आहेत. या नव्या अटींनुसार आंब्यांवर नियंत्रित तापमानातील गरम पाण्याद्वारे प्रक्रिया करण्याची म्हणजेच ‘हॉट वॉटर ट्रीटमेंट’ची अट समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा उद्देश वनस्पती आरोग्याचे संरक्षण आणि कीड-रोगांचा प्रसार रोखणे हा आहे. भारताने नेपाळच्या या सुधारित अटींचे पालन करत निर्यात प्रक्रिया सुरू ठेवली असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
तथापि, अशा नव्या वनस्पती आरोग्यविषयक अटी पूर्वसूचना किंवा परस्पर सल्लामसलत न करता लागू करण्यात आल्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात भारताने संबंधित मुद्दा योग्य द्विपक्षीय मंचांवर उपस्थित केला असून जागतिक व्यापार संघटनेच्या आरोग्य व वनस्पती आरोग्य करार तसेच आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण कराराच्या चौकटीत या विषयाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली.
भारतीय आंब्यांना नेपाळमध्ये मोठी मागणी असून दरवर्षी उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. त्यामुळे अशा अफवांमुळे शेतकरी, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने भागधारक, व्यापारी, निर्यातदार आणि सर्वसामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे की, आयात-निर्यातविषयक माहितीबाबत केवळ अधिकृत शासकीय निवेदनांवर अवलंबून राहावे. भारतीय आंब्यांच्या नेपाळमधील आयातीवर निर्बंध लादल्याच्या अनधिकृत आणि अप्रमाणित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारतीय आंब्यांच्या निर्यातीबाबत कोणतीही अडचण नसून दोन्ही देशांतील व्यापार व्यवहार नियमितपणे सुरू असल्याने आंबा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.

